अयोध्या - दु:ख, वेदना नसलेल्या राम राज्याची संकल्पना अयोध्येने दिली. सध्याच्या घडीला सर्वांना घर, वीज आणि प्रत्येक घरामध्ये एलपीजी सिलिंडर मिळाला तर ते ख-या अर्थाने राम राज्य असेल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. अयोध्येमध्ये दीपोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाने अयोध्येमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे. शरयू नदीच्या तीरावर यावेळी 'जय श्री राम'चा नारा दिला जात होता.
केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार राम राज्य निर्माण करण्याच्या दिशेने काम करत असून, मोदी सरकारच्या कामामुळे सर्वसामान्य जनतेला जे सुख मिळेल तेच राम राज्य असेल असे योगी म्हणाले. प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर हक्काचे छप्पर असले पाहिजे. 2019 पर्यंत प्रत्येक घरामध्ये शौचालय तसेच वीज मिळाली पाहिजे. पंतप्रधानांचे ते स्वप्न आहे. हेच खरे राम राज्य आहे असे योगी म्हणाले.
प्रत्येक गरीबाला स्वत:चे घर, रोजगार, वीज मिळाली तर त्याच्यासाठी तेच राम राज्य असेल. पंतप्रधानांनी अस्वच्छता, गरीबी, जातियवाद, सांप्रदायिकता, दहशतवाद, नक्षलवाद मुक्त भारताचा संकल्प केला आहे असे योगी म्हणाले.