- हरीश गुप्ता, नवी दिल्लीभारतीय अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम आहे, त्यामुळे रुपयाचे अवमूल्यन आणि शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे घाबरण्याचे वा चिंता करण्याचे काही कारण नाही, असे साहसी वक्तव्य केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि त्यांचे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केलेले असले तरी संकट अद्याप टळलेले नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.जागतिक अर्थव्यवस्थेत सर्व काही आलबेल नाही आणि महागाईवरील युद्ध अद्याप संपलेले नाही, असे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे गेल्या काही दिवसांपासून देत आलेले आहेत. सात टक्के विकास दर आणि शेअर बाजाराचा प्राईज अर्निंग रेशो ३० पट राहणे हा गंभीर चिंतेचा विषय आहे, असे राजन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. त्यानंतर सोमवारी त्याची प्रचिती आली आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आणि निफ्टीमध्ये लक्षणीय घसरण पाहायला मिळाली.चलन युद्धाने वाईट वळण घेतले तर निर्देशांक २० हजारापर्यंत कोसळण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किंमतीत प्रचंड घट झाल्यामुळे भारताला फायदा झाला असला तरी डॉलरच्या तुलनेत रुपयाची ७० पर्यंत घसरण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादने स्पर्धेतच राहणार नसल्याने भारतीय उत्पादक आणि निर्यातदार यांना जबरदस्त फटका बसेल, याची मोदी सरकारला जास्त चिंता वाटत आहे. एका दिवसात शेअर बाजाराचा निर्देशांक १७०० अंकाने घसरणे आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होऊन तो प्रति डॉलर ६६.७४ वर येण्याचा थेट संबंध जागतिक बाजारपेठ आणि चलनाशी आहे. जागतिक मंदी आणि एका आठवड्यात आपल्या चलनाचे तब्बल सहा टक्क्याने अवमूल्यन करून चीनने छेडलेल्या चलन युद्धाचा तो एक भाग आहे. चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन करून आणि जागतिक निर्यात बाजारपेठ काबीज करून एकप्रकारे आर्थिक युद्धच पुकारले आहे, असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत या आर्थिक संकटाबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. वित्त मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक आणि अन्य सरकारी संस्था या चालू संकटावर लक्ष ठेवून आहेत. युरोप आणि सिंगापूरच्या शेअर बाजारात सोमवारी सायंकाळी मोठी घसरण झाली असतानाच अमेरिकेचा शेअर बाजार पुन्हा एकदा कोसळला. त्यामुळे अनिश्चितता कायम राहणार हे निश्चित आहे. आता रुपया व शेअर बाजारातील ही घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक हस्तक्षेत करेल असे वाटत नाही आणि वित्तीय संस्था बाजारात प्रचंड पैसा ओततील, अशी शक्यताही दिसत नाही. याबाबत मंगळवारी दुपारपर्यंत एखादा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.मोठे आर्थिक प्रश्न नियंत्रणात आहेत आणि महागाईत घट झाल्याने गुंतवणूकदारांचा बाजारातील विश्वास वाढेल. त्यामुळे अन्य उदयमान बाजार अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था बरी आहे, असे राजन सांगत आहेत. परंतु व्याज दरात कपात करण्याच्या संदर्भात मात्र राजन काहीएक बोलायला तयार नाहीत. व्याजदर कमी करण्यात आले पाहिजे असे वित्तमंत्री अनेक दिवसांपासून सांगत आहेत, हे विशेष.मोदी सरकार अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कठोर परिश्रम घेत असताना हे संकट ओढवले आहे. त्यामुळे आपल्या दारावर येऊन ठेपलेले हे आर्थिक संकट पाहता आता अमेरिकाही सप्टेंबर महिन्यात व्याज दरात वाढ करण्याचा विचार करीत आहे. याचाच अर्थ हे ‘क्वांटेटिव्ह इजिंग’ डिसेंबरपर्यंत तरी कायम राहील.
बाजारातील घसरणीमुळे मोदी सरकार चिंतित
By admin | Published: August 25, 2015 4:26 AM