ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वर्षातील आपल्या सरकारच्या कामगिरीचे गुणगान करत असताना, काँग्रेसने मात्र त्यांचे दावे खोडून काढताना त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नरेंद्र मोदी सरकाराचा दोन वर्षातील कारभार निराशाजनक असून, अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासह सर्व आघाडयांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे.
हे सरकार जाहीरातींवर चालते. महत्वाच्या क्षेत्रातील कामगिरी हताश करणारी आहे. रुपयाची घसरण सुरु असून, महागाई वाढली आहे. रोजगार निर्मितीची वेगही धीमा आहे. पंतप्रधानांनी वर्षाला दहा कोटी रोजगार निर्मिती करु असे सांगितले होते पण प्रत्यक्षात वर्षाला १.३२ लाख नव्या नोक-या निर्माण होत आहेत अशी टीका काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केली.
मोदी सरकारची दोन वर्षातील मोठी कामगिरी कोणती असेल तर ती, अकारण वाद निर्मिती, सामाजिक तणाव वाढवणे आहे असे टोले आझाद यांनी लगावले. चीन आणि पाकिस्तान या दोन देशांच्या बाबतीत मोदींचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे फसले आहे. मागच्या दोन वर्षात पाकिस्तानने एक हजार वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असे आझाद म्हणाले.