देशभरातील रेल्वेच्या विकासासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्राने 7 मोठे प्रकल्प मंजूर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांचे काम सुरू झाल्यानंतर भारतीय रेल्वे आधुनिक होईल आणि सुविधाही पूर्वीपेक्षा चांगल्या होतील, असा विश्वास केंद्र सरकारला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पांतर्गत देशात अनेक ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग आणि जुन्या मार्गाचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे.
यासाठी सरकारने 32,500 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च निश्चित केला आहे. यापैकी 4195 कोटी रुपये खर्चून देशभरातील 508 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या स्थानकांवर प्रवाशांना सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा पुरविल्या जातील. विशेष म्हणजे रेल्वेच्या विकासासाठी ही सर्व कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत केली जाणार आहेत.
अशी बातमी आहे की, भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील आणू शकते. त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. पुढील वर्षी वंदे भारत स्लीपर गाड्यांची पहिली खेप येण्याचा अंदाज आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, डिसेंबरपासून चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत ट्रेनसाठी स्लीपर बोगी तयार केल्या जातील. पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत काही स्लीपर ट्रेन तयार होण्याचा अंदाज आहे.