नवी दिल्ली - केंद्र सरकार त्यांच्या लाखो कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चालणाऱ्या सरकारनं जुलै महिन्यात पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता आहे. यावेळी डीएमध्ये ४ टक्के वाढ होणार असल्याची चर्चा आहे. महागाई भत्त्यात ही वाढ झाली तर जुलै महिन्यापसून केंद्र सरकारच्या जवळपास ५० लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाल्याचं दिसून येईल.
पुढील महिन्यात होऊ शकते घोषणामिळालेल्या माहितीनुसार, सलग २ महिने एआयसीपीआय इंडेक्स कमी झाला तरीही मार्चमध्ये पुन्हा त्यात वाढ झाल्याचं दिसलं. जानेवारीत इंडेक्स कमी होऊन १२५.१ वर आला होता. त्यानंतर फेब्रुवारीत १२५ अंकावर आला होता. मात्र मार्च महिन्यात एका झटक्यात इंडेक्स १ अंकाने वाढून १२६ वर पोहचला. त्यामुळेच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकार १ जुलैपासून डीए ४ टक्क्यांनी वाढवत असल्याची घोषणा करू शकते.
सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी पगारात डीए दिला जातो. सातव्या वेतन आयोगानुसार, डीए वर्षातून दोनदा वाढवला जातो. पहिल्यांदा महागाई भत्ता जानेवारी महिन्यात वाढला होता. तर दुसऱ्यांदा जुलै महिन्यात वाढवला जाऊ शकतो. सरकारचा हा निर्णय महागाई दरावर आधारित असतो. मार्चपासून एआयसीपीआय इंडेक्समध्ये वाढ झाल्यानं महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढू शकतो.
आता किती होईल महागाई भत्ता?सरकारने यावर्षी सुरुवातीला ३ टक्क्यांनी महागाई भत्त्यात वाढ केली. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता दिला जातो. जुलैमध्ये महागाई भत्ता वाढल्यास डीए ३८ टक्क्यांवर पोहचेल. जर सरकारने डीए वाढवण्याचा निर्णय घेतला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना तात्काळ याचा लाभ होत पगारात वाढ होईल. कोरोना महामारीमुळे काही काळ डीए वाढवण्यावर स्थगिती होती. दीड वर्षानंतर केंद्र सरकारने मागील वर्षी जुलै महिन्यात डीए १७ टक्क्यांनी वाढवून २८ टक्के केला होता.
किती मिळेल पगार?जर १ जुलैपासून डीए वाढवून ३८ टक्के इतका केला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. त्याचा लाभ लाखो कर्मचाऱ्यांना मिळेल. ज्यांची बेसिक सॅलरी ५६९०० रुपये आहे अशा कर्मचाऱ्यांना दर महिन्याला १९३४६ रुपये महागाई भत्ता मिळत होता. डीए दर ३८ टक्क्यांनी वाढला तर मासिक रक्कम २१ हजार ६२२ रुपये होईल. त्याचा अर्थ या कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात २ हजार २७६ रुपये आणि वार्षिक २७ हजार ३१२ रुपये वाढ होईल.