Petrol and Diesel Prices Reduced: लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशातील सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात करण्यात आली असून, नवीन किमती 15 मार्च 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. ते म्हणाले की, 'पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 2 रुपयांनी कपात करुन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, कोट्यवधी कुटुंबाचे कल्याण हे त्यांचे ध्येय आहे. जग कठीण काळातून जात असताना विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलचे दर 50 ते 72 टक्क्यांनी वाढले होते. आपल्या शेजारील अनेक देशांमध्ये तर पेट्रोल उपलब्ध नव्हते. 1973 नंतर पहिल्यांदाच इंधनाचे सर्वात मोठे संकट असूनही पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे देशावर त्याचा परिणाम झाला नाही. भारतातील पेट्रोलचे दर वाढण्याऐवजी गेल्या अडीच वर्षांत 4.65 टक्क्यांनी कमी झाले.'
39 देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी पुरी यांनी पुढे लिहिले की, 'भारतात इंधनाचा पुरवठा स्थिर राहिला, स्वस्त दरात राहिला आणि सरकारची पावलेही हरित ऊर्जेकडे जात राहिली. याचा अर्थ भारताने उर्जेची उपलब्धता, शाश्वतता राखली. भारत हा एकमेव देश होता, जिथे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत. पीएम मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी 27 देशांकडून कच्चे तेल खरेदी करायचो, परंतु मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या देशवासीयांना स्वस्त पेट्रोल, डिझेल आणि गॅस देण्यासाठी ही व्याप्ती वाढवली आणि आता गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही 39 देशांकडून खरेदी करत आहोत.'
भारतातील पेट्रोलचे दर अनेक देशांपेक्षा कमी हरदीप पुरी पुढे लिहितात, '14 मार्च 2024 रोजी भारतात(भारतीय रुपयांप्रमाणे) पेट्रोल सरासरी ₹ 94 प्रति लिटर आहे, परंतु इटलीमध्ये ते ₹ 168.01, म्हणजेच 79% जास्त; फ्रान्समध्ये ₹166.87, म्हणजेच 78% जास्त; जर्मनीमध्ये ₹ 159.57, म्हणजेच 70% जास्त आणि स्पेनमध्ये ₹ 145.13, म्हणजेच 54% जास्त दराने विकले जाते. डिझेलच्या किमतींची तुलना केली, तर भारतात सरासरी ₹ 87 प्रति लिटर आहे, तर इटलीमध्ये ₹ 163.21, म्हणजेच 88% जास्त, फ्रान्समध्ये ₹163.57 म्हणजेच 86% जास्त, जर्मनीमध्ये ₹ 155.68, म्हणजे 79% जास्त आणि स्पेनमध्ये ₹ 138.07 म्हणजे 59% जास्त आहे.
जगभरात काहीही घडत असले तरी, मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक नागरिकाचा इंधन पुरवठा अखंडीत राहावा, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. देशाच्या प्रगतीचा वेग कधीच थांबला नाही. आजही आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत दिलासा होताच पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करुन त्यांच्या कुटुंबाला आणखी एक भेट दिली. मोदींनी नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी केले, तर भाजप शासित राज्यांनी व्हॅट दर कमी केले. हेच कारण आहे की, आजही भाजपशासित राज्ये आणि इतर राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमतीत सुमारे ₹15 आणि डिझेलच्या दरात सुमारे ₹11 चा फरक आहे.