मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण व्यक्ती केंद्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:04 AM2018-03-19T02:04:41+5:302018-03-19T02:04:41+5:30
मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण हे व्यक्ती केंद्रीत आणि दिशाहीन असल्याची टीका काँग्रेसने येथे महाधिवेशनात केली आहे. सरकार मोठ्या देशांसोबतचे संबंध चांगले ठेऊ शकले नाही.
नवी दिल्ली : मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण हे व्यक्ती केंद्रीत आणि दिशाहीन असल्याची टीका काँग्रेसने येथे महाधिवेशनात केली आहे. सरकार मोठ्या देशांसोबतचे संबंध चांगले ठेऊ शकले नाही. पाकिस्तान, चीनसारख्या देशांच्या आव्हानांना तोंड देण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोपही करण्यात आला.
महाधिवेशनात परराष्ट्र धोरणावर सादर प्रस्तावात पं. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या काळातील परराष्ट्र धोरणाची स्तुती करण्यात आली. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले की, देशाचे परराष्ट्र धोरण राष्ट्रीय सहमतीसह मजबूत राहिलेले आहे. मात्र, भाजपामुळे राष्ट्रीय सहमतीच भंग पावली आहे.
काँग्रेसने म्हटले की, परराष्ट्र धोरणाबाबत सद्या भ्रम निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत सद्या जगात संक्रमणाचा काळ आहे. आमच्या परराष्ट्र धोरणापुढेही अनेक आव्हाने आहेत. शेजारी देशांकडून अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधानांचे विदेश दौरे फक्त दोन देशांतील व्यवहारापुरतेच मर्यादित राहिले आहेत.
पाकिस्तानबाबत अधिक प्रभावी आणि आक्रमक धोरणाचा दावा खोटा आहे. याचे कोणतेही सकारात्मक परिणाम मिळाले नाहीत. यूपीएच्या काळात भारत- पाकिस्तानातील तणाव कमी झाला होता. आनंद शर्मा यांनी म्हटले आहे की, परराष्ट्र धोरण ‘इव्हेंट मॅनेजमेंट आणि फोटो आॅपर्च्युनिटी’ असू शकत नाही. यासाठी गांभीर्य असायला हवे.