नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना बुधवारी सीबीआयने केलेली अटक हा केवळ सूडाच्या राजकारणाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार स्वत:च्या भ्रष्ट कारभारावरील लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हे जाणीवपूर्वक करीत आहे, असा आरोप बुधवारी काँग्रेसकडून करण्यात आला.काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, कार्ती यांना आयएनक्स मीडिया कंपनीला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन बोर्ड (एफआयपीबी) कडून मिळालेल्या मंजुरीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक केली आहे. कार्ती हे काही नीरव मोदी वा चोकसीसारखे पळून जाणारे नव्हते. किंबहुना ते परदेशातून परत आले होते. मोदी-चोकसीच्या पलायनाला मदत करायची आणि राजकीय विरोधकांना त्रास द्यायचा, असे मोदी सरकारचे राजकारण आहे.परंतु काँग्रेस पक्ष या कारवाईमुळे नाउमेद होणार नाही. या प्रकरणातील सत्य लवकर जनतेसमोर मांडले जाईल. कार्ती यांच्यावर केलेली कारवाई हे फक्त सूडाचे राजकारण आहे, असेही त्यांनी सांगितले.मोदी सरकारच भ्रष्ट : नीरव मोदी, मेहुल चोकसी, द्वारकादास सेठ ज्वेलर्स आदी प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. त्यातून मोदी सरकारचा भ्रष्ट कारभार उघडा पडत आहे. यावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी मोदी सरकारने ही चाल खेळली आहे, असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप सरकार असे दडपशाहीचे राजकारण नेहमी करीत आले आहे, असाही आरोप त्यांनी केला.
लक्ष वळविण्याची मोदी सरकारची चाल, भाजपावर कॉंग्रेसकडून दडपशाहीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:39 AM