नवी दिल्ली - अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीवरून काँग्रेसने सोमवारी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारचा धोरण लकवा, धार्मिक संघर्ष आणि भ्रष्टाचारामुळेच रुपया आयसीयूमध्ये गेला असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितले की, "देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रुपया 77.41 रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. 75 वर्षांनंतर प्रथमच रुपया आयसीयूमध्ये आहे आणि भाजपाच्या मार्गदर्शक मंडळाने निश्चित केलेले वय ओलांडले आहे. त्यांनी पंतप्रधानपदाचे वय केव्हाच ओलांडले आहे."
रणदीप सुरजेवाला यांनी "चहूबाजूला महागाईचा हाहाकार आहे आणि लोकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. देशात गुंतवणूक येत नाही, उलट परत गेली आहे. भ्रष्टाचार, धोरण लकवा आणि धर्माच्या आधारावर अशांतता यामुळे आम्ही येथे गुंतवणूक करत नाही. देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यातील घसरणीमुळेही रुपयाचे मूल्य घसरले आहे. जेव्हा अशांतता असेल, भ्रष्टाचार असेल, धोरण लकवा असेल, तेव्हा रुपया कमजोर होईल" असं म्हटलं आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. यामध्ये "असं नाही मित्रांनो, मी सरकारमध्ये बसलो आहे, मला माहीत आहे... रुपया इतक्या वेगाने घसरू शकत नाही, मग आज रुपया, हिंदुस्थानच्या 75 वर्षांच्या इतिहासात सर्वात खालच्या पातळीवर पोहोचण्याचे कारण काय? त्याच्या याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल, मोदीजी, देश तुमच्याकडे उत्तर मागत आहे" असं म्हटलं आहे. तसेच सुरजेवाला यांनी यासोबत पीएम मोदींचा एक जुना व्हिडिओ देखील शेअर केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.