ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - पेट्रोल पंप डिलर्सच्या संघटनेने पेट्रोल पंप दर रविवारी बंद ठेवण्याचा घेतलेल्या निर्णयाला तेल मंत्रालयाने विरोध केला आहे. महाराष्ट्रासह आठ राज्यातील पेट्रोल पंप दर रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून असं झाल्यास सर्वसामान्यांना खूप मनस्ताप होईल असं तेल मंत्रालयाने सांगितलं आहे. तेल मंत्रालयाने यासंबंधी ट्विट करत परखडपणे मत मांडत निर्णयाला स्पष्ट विरोध केला आहे.
तेल मंत्रालयाने ट्विटमध्ये सांगितलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठवड्यातून एक दिवस इंधन न वापरण्याचं आवाहन केलं होतं. हे आवाहन देशवासियांसाठी होतं, आपला पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेल्या डिलर्ससाठी नाही. तेल मंत्रालय या निर्णयात सामील असणा-या कोणाचंही समर्थन करत नाही. अशा प्रकारे डिलर्सच्या छोट्या गटाने पेट्रोल पंप बंद ठेवल्यास सर्वासामान्य वाहनचालकांना मनस्ताप होईल. महत्वाच्या डिलर्स असोसिएशनने आपण पेट्रोल पंप बंद ठेवण्याच्या कोणत्याही निर्णयात सहभागी नसल्याचं स्पष्ट केलं आहे".
@PetroleumMin neither endorses nor approves of move by small section of dealers to keep their petrol pumps closed on Sundays @dpradhanbjp— Petroleum Ministry (@PetroleumMin) April 19, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून आठवड्यातून एकदा इंधन न वापरुन बचत करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र इंधनबचत ही वाहनचालकांनी स्वयंस्फूर्तीने करावी, पेट्रोल पंप बंद ठेवणे, हा त्यावरील उपाय नसल्याचं मोदी सरकारने ठणकावून सांगितलं.
महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबईसह दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक (मुख्यत्वे बंगळुरु भागातील), आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुदुच्चेरी आणि हरियाणा या आठ राज्यांमध्ये पेट्रोलपंप दर रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 14 मेपासून हा निर्णय लागू करण्याचं ठरलं होतं. ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने आपण या उपक्रमात सहभागी होणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. पब्लिक सेक्टरमधील 53 हजार 224 पेट्रोल पंपांपैकी 80 टक्के ‘ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन’मध्ये येतात.