नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राजीव गांधी फाउंडेशन व राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या दोन स्वयंसेवी संस्थांचे एफसीआरए (परदेशी योगदान नियमन कायदा) परवाने रद्द केले आहेत. कायद्याच्या कथित उल्लंघनावरून ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
२०२० मध्ये स्थापन केलेल्या आंतर मंत्रालयीन समितीच्या चौकशीनंतर राजीव गांधी फाउंडेशन व राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे एफसीआरए परवाने रद्द करण्यात आले. या संस्थांनी विवरणपत्र भरताना कागदपत्रांत फेरफार, चीनसह परदेशातून निधी मिळवताना मनी लाँड्रिंग व निधीचा दुरुपयोग केल्याचे चौकशीत समोर आले, असे सूत्रांनी सांगितले.काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या दोन्ही स्वयंसेवी संस्थांच्या अध्यक्ष आहेत. चीनने २००५ ते २००९ दरम्यान राजीव गांधी फाउंडेशनला अभ्यासासाठी निधी दिला होता, असा आरोप सत्ताधारी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला होता.
संस्था नेमके काय करतात?>> १९९१मध्ये स्थापन झालेल्या राजीव गांधी फाउंडेशनने २००९पर्यंत आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान, महिला आणि मुले व दिव्यांगांना सहाय्य यासह शिक्षण क्षेत्रातही काम केले.
>> राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना २००२मध्ये देशातील वंचित लोकांच्या, विशेषतः ग्रामीण गरिबांच्या विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली.
>> ही संस्था राजीव गांधी महिला विकास योजना तसेच इंदिरा गांधी नेत्र रुग्णालय आणि संशोधन केंद्र या दोन विकास उपक्रमांद्वारे उत्तर प्रदेशातील गरीब भागांसह हरयाणा व देशातील सर्वात मागास राज्यांमध्ये काम करते.