नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने देशातील घराणेशाहीचे आणि लांगुलचालनाचे राजकारण मोडून काढले अशा स्पष्ट शब्दांमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली. रालोआ सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे झाल्याबद्दल पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळेस पत्रकार परिषदेत अमित शाह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लांगुलचालनाचे, घराणेशाहीचे तसेच जातीवादाचे राजकारण संपवले आहे. त्याबरोबरच मोदी यांनी विकासाच्या राजकारणाला अग्रक्रम दिला दिला आहे.
वन रँक वन पेन्शन सारखे प्रलंबित विषयही या सरकारने तडीस लावले आहेत. काळा पैसा रोखण्यासाठी विशेष तपासणी पथकाची निर्मिती या सरकारने केली. असे शाह यांनी सांगितले. काळ्या पैशाचा मुद्दा 2014 साली प्रचाराच्या वेळेस भाजपाने उचलला होता. अमित शाह यांच्याबरोबर अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही या सरकारबद्दल मत व्यक्त केले आणि आर्थव्यवस्था सुधारत असल्याचे फेसबूकवर लिहिलेल्या ब्लॉगमधून मांडले आहे.
गेल्या चार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील उत्तम सरकार आणि उत्तम अर्थकारण व चांगले राजकारण यांच्या एकत्रित मिश्रणामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारली. एकेकाळी भारत फ्रॅजाईल फाईव्ह (नाजूक अर्थव्यवस्था असणारे पाच देश) यादीतून जगभरात ब्राईट स्पॉट म्हणजे लखलखता तारा म्हणून आता ओळखला जातो असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. अरुण जेटली यांनी मुद्रा योजना, पीक विमा योजना आणि ग्रामिण भागातील रस्त्यांसाठी दिलेल्या निधीबाबतही यांनी लिहलं आहे. पायाभूत सुविधांच्या विकासावर या वर्षात 134 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचं आव्हान स्वीकारवं अशी टीका केली होती, त्यावर अरुण जेटली यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांची खिल्ली उडवताना त्यांनी लिहिलं आहे, कराचा पैसा सरकारच्या खिशात जात नसतो हे काँग्रेस अध्यक्षांना माहिती असायला हवं.