नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. जातीय समीकरण जुळवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनविण्यात आले होते. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांनी राष्ट्रपती पदावर विराजमान होता आले नाही, असे अशोक गहलोत यांनी भाजपा सरकारवर टीका करताना म्हटले आहे.
"गुजरातच्या निवडणुका येत होत्या. गुजरातमध्ये आपले सरकार बनत नाही, त्यामुळे ते (भाजपा) घाबरले होते. मला असे वाटते की, रामनाथ कोविंद यांना जातीय समीकरण जुळवण्यासाठी राष्ट्रपती बनविले आणि लालकृष्ण आडवाणी यापासून सुटले." असे अशोक गहलोत यांनी म्हटले आहे. अशोक गहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात अशोक गहलोत यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी बहुजन पार्टीच्या प्रमुख मायावती, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, समाजवादवादी पार्टीचे नेते आझम खान आणि भाजपा नेत्या व केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने या सर्वांवर प्रचारबंदी घातली आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या या कारवाईनंतरही बाकीच्या राजकीय नेत्यांवर काही परिणाम होताना दिसत नाही.
दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.