नवी दिल्ली: गेल्या 70 वर्षांच्या काळात मुस्लिमांच्या मनात बरंच विष भिनलं आहे. त्यामुळे मोदी सरकारला मुस्लिमांची मनं जिंकायला बरेच कष्ट घ्यावे लागतील, असे मत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले. ते रविवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते.यावेळी त्यांनी म्हटले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने मुस्लिमांना त्यांच्यासाठी सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या योजनांची माहिती द्यायला हवी. तसेच तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्यासाठी सरकारने कशाप्रकारे प्रयत्न केले, हेदेखील मुस्लीम समुदायापर्यंत पोहोचले पाहिजे. एकूणच मुस्लिमांची मनं जिंकायला आम्हाला अजून बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. कारण, गेल्या 70 वर्षांच्या काळात त्यांच्या मनात कायम विषंच पेरण्यात आलं. परंतु एक गोष्ट चांगली आहे की, मुस्लीम समाजातील तरुण पिढी गुण आणि अवगूण या दोन घटकांच्या आधारेच भाजपा सरकारचे मूल्यमापन करत आहे. ही खूपच सकारात्मक बाब असल्याचे नक्वींनी सांगितले. यावेळी नक्वी यांनी कैराना लोकसभा मतदारसंघातील पराभव हा भाजपासाठी धोक्याची घंटा असल्याचा दावाही नाकारला. कैरानात पराभव झाला म्हणून आम्ही सर्व निवडणुकांमध्ये हरणार, असे होत नाही. विरोधी पक्ष आमच्याविरुद्ध एकत्र आले आहेत, ही बाब आता आम्हाला समजली आहे. त्यामुळे आता आम्ही त्यादृष्टीने रणनीती आखू, असेही नक्वी यांनी सांगितले.
'मुस्लिमांच्या मनात बरंच विष भिनलंय, त्यांची मनं जिंकायला भाजपाला बरेच कष्ट घ्यावे लागतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 5:43 PM