नवी दिल्ली : मोदी सरकार -2 कामाला लागले आहे. सरकारने गुरुवारी आठ कॅबिनेट समित्या स्थापन केल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, या प्रत्येक समितीत सदस्य म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी आणि वाढत्या बेरोजगारीचा सामना करण्यासाठी दोन नवीन कॅबिनेट समित्या स्थापन केल्या आहेत. पहिल्यांदाच अशा दोन समित्या स्थापन केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आर्थिक विकास आणि गुंतवणूक तथा रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी नवीन कॅबिनेट समित्या स्थापन केल्या. गुंतवणूक आणि विकास यावर आधारित कॅबिनेट समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण, नितीन गडकरी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा समावेश आहे. याचबरोबर, रोजगार आणि कौशल्य विकास यासंबंधी दहा सदस्य असलेली एक समिती स्थापन केली आहे. यामध्येही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारामण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कौशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे, राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार आणि हरदीप सिंह पुरी यांचा समावेश करण्यात आला आहे.
गुरुवारी ज्या समित्यांची घोषणा करण्यात आली, यामध्ये मंत्रिमंडळाची निवड समिती (एसीसी) स्थापन करण्यात आली. यामध्येही अमित शहा सदस्य आहेत. याशिवाय गृहनिर्माण संबंधी बनविण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या समितीच्या अध्यक्षपदी अमित शहा आहेत. या समितीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल सदस्य आहेत. तर, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री हरदीप पुरी गृहनिर्माण समितीचे विशेष आमंत्रित सदस्य असणार आहेत.
आर्थिक मुद्द्यांवर आधारित मंत्रिमंडळातील प्रमुख समितीच्या (सीसीईए) अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत. तर, या समितीत राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, डी.व्ही. सदानंद गौडा, निर्मला सीतारामण, एस. जयशंकर, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, रविशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल हे सदस्य आहेत.
संसदीय संबंधी मंत्रिमंडळाच्या समितीच्या अध्यक्षपदी अमित शहा असणार आहेत. तसेच, यामध्ये निर्मला सीतारामन, रामविलास पासवान, नरेंद्र सिंह तोमर, रविशंकर प्रसाद, थावरचंद गहलोत, प्रकाश जावडेकर आणि प्रल्हाद जोशी या समितीत असणार आहे. ही समितीकडून संसदेचे अधिवेशन बोलविण्यासाठी तारखांची शिफारस करण्यात येते. या समितीचे अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन विशेष आमंत्रित सदस्य आहेत.
याचबरोबर, महत्त्वाच्या धोरणांसंबंधी निर्णयावर सरकारची मदत करणाऱ्या राजकीय बाबींवरील मंत्रिमंडळाच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. या समितीत अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सितारामण, पीयूष गोयल, रामविलास पासवान, नरेंद्र सिंह तोमर, रविशंकर प्रसाद, हरसिमरत कौर, हर्षवर्धन, अरविंद सावंत आणि प्रल्हाद जोशी सदस्य असणार आहेत.
(वाढत्या बेरोजगारीचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय)