वाराणसी, दि. 19- उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. वाराणसी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ आहे. वाराणसी भागाचे ते खासदार आहेत. भिंतीवर लावलेल्या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, बेपत्ता वाराणसीचे खासदार. तसंच पोस्टरवर मोदींचा फोटोही लावण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पोस्टरवर एक घोषणा लिहिण्यात आली आहे. 'जाने वह कौन सा देश जहां तुम चले गए' असं त्या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं आहे. पण हे पोस्टर नेमकं कोणी लावलं याबद्दलची कुठलीही माहिती अजून उपलब्ध झालेली नाही.
पोस्टरच्या सगळ्यात खाली पोस्टर लावणाऱ्याने एक ओळ लिहिली आहे. 'एक लाचार, असहाय्य आणि हताश काशीवासी', असं त्या व्यक्तीने म्हंटलं आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लागल्यावर तेथिल प्रशासकीय विभागात चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ पाऊलं उचलत रात्री उशिरा रस्त्यावरील पोस्टर्स हटविली. मोदी बेपत्ता झाल्याचे पोस्टर लावणाऱ्याबद्दल अजून कुठलीही माहिती मिळालेली नाही.
मोदींचा पत्ता लागला नाही तर नाईलाजाने मोदी बेपत्ता झाल्याची तक्रार काशीवासीयांना करावी लागेल, असंही त्या पोस्टरमध्ये म्हंटलं आहे.
राहुल गांधी बेपत्ता असल्याचंही झळकावलं होतं पोस्टरकाँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं लोकसभा क्षेत्र असलेल्या अमेठी भागात राहुल गांधी बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले होते. राहुल गांधी यांना शोधून आणणाऱ्यांना बक्षीस मिळणार असल्याचंही या पोस्टर्समध्ये नमूद करण्यात आलं होतं. अमेठीमधील काँग्रेस कार्यालयाच्या समोरच हे पोस्टर लावण्यात आलं. या पोस्टरवर लिहिलं आहे,'माननीय खासदार राहुल गांधी अमेठीमधून बेपत्ता आहेत. ज्यामुळे खासदाराकडून केली जाणारी विकास कामं यांच्या कार्यकाळात ठप्प आहेत. राहुल गांधी यांच्या या व्यवहारामुळे अमेठीच्या लोकांच्या मनात अपमानित भावना निर्माण झाली आहे'. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेली सहा महिने अमेठीमध्ये हजेरी लावली नसल्याने तेथिल लोकांनी असे पोस्टर्स लावल्याची चर्चा सुरू होती.
आरएसएस आणि भाजपाच्या लोकांकडून राहुल गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. राहुल गांधी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत म्हणून ते प्रत्येक वेळी अमेठीमध्ये उपस्थित राहू शकत नाही, असं प्रदेश काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष योगेन्द्र मिक्षा म्हणाले होते.