मोदींनी कधीच केले नाही चौकीदारांचे भले - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 05:55 AM2019-03-23T05:55:44+5:302019-03-23T05:56:18+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांचा नावाचा वापर करत आहेत, त्या चौकीदारांच्या कल्याणासाठी त्यांनी काही केलेले नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांचा नावाचा वापर करत आहेत, त्या चौकीदारांच्या कल्याणासाठी त्यांनी काही केलेले नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. चौकीदारांना बारा तास काम करूनही अत्यल्प वेतन मिळत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
कमी वेतन मिळत असल्याच्या निषेधार्थ झारखंडमधील १० हजार चौकीदारांनी निदर्शने केली. त्या बातमीचा हवाला देऊन राहुल म्हणाले की, मोदी स्वत:ला ‘चौकीदार’ म्हणतात, पण त्यांनी चौकीदारांचे भले करण्याचा विचार करावा. आपण चौकीदार असल्याचा प्रचार मोदी यांनी २०१४ साली केला. त्याचा उल्लेख ते सतत आहेत. राफेल विमाने खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करून काँग्रेसने मोदींवर ‘चौकीदारच चोर आहे’ अशी जिव्हारी लागणारी टीका केली आहे.
फारुक अब्दुल्लांचा प्रचार सुरू
धर्मनिरपेक्ष देश हे भारताचे स्वरूप कायम राखण्यासाठी व फूट पाडणाऱ्या राजकारणापासून देशाला वाचविण्यासाठी काँग्रेसशी जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही आगामी लोकसभा निवडणुकांत आघाडी केली आहे, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी सांगितले. जम्मूतील या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारमोहिमेचा प्रारंभ अब्दुल्ला यांनी शुक्रवारी केला.