मोदी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत : डॉ. मनमोहन सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 01:29 AM2018-10-28T01:29:57+5:302018-10-28T06:30:01+5:30
अनेक प्रश्नांवर मौन बाळगल्याबद्दल टीकेची झोड
नवी दिल्ली : अतिशय संयमी नेते म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी एका समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोडच उठवली. मतदारांनी मोदी यांच्यावर खूप विश्वास टाकून, त्यांच्या पक्षाला भरभरून मते दिली; पण मोदी मात्र जनतेच्या विश्वासास पात्र ठरले नाहीत, असे उद्गार त्यांनी काढले.
पंतप्रधान मोदी यांच्यावरील जनतेचा विश्वास वेगाने कमी होत चालला आहे, असे सांगून डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, पंतप्रधान हा पक्षाचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा असतो; पण मोदी यांच्या काळात सीबीआयसारख्या प्रतिष्ठित तपास यंत्रणेची विश्वासार्हता कमी झाली, ही वस्तुस्थिती आहे. जातीय व धार्मिक हिंसाचार, जमावाकडून विशिष्ट लोकांवर होणारे हल्ले, गोरक्षकांकडून होणारी मारहाण या सर्व विषयांवर मोदी यांनी मौनच बाळगले. एवढेच नव्हे, तर त्यांच्याच काळात अनेक विद्यापीठांमधील वातावरणही बिघडले आणि कलुषित झाले, हे सर्वज्ञात आहे. काँग्रेसचे खा. शशी थरूर यांच्या ‘द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी पंतप्रधानांच्या हस्ते झाले. २0१४ साली खोटी आश्वासने दिली आणि सत्ता मिळवली; पण चार वर्षांत त्यांनी जनतेचा विश्वासघातच केला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
प्रशासनावर नियंत्रण नाही : शौरी
या समारंभास माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम, तसेच अरुण शौरी हेही उपस्थित होते. आपली फसवणूक झाल्याची जाणीव आता जनतेला व्हायला लागली आहे. मोदी यांचे प्रशासनावर अजिबात नियंत्रण नसल्याचे सीबीआय प्रकरणावरून स्पष्टच झाले आहे, अशी टीका अरुण शौरी यांनीही केली.