आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या पाच राज्यांच्या निवडणुका देशातील राजकीय वातावरण कसे आहे ते दर्शवितात. आज पाचव्या राज्यातील मतदानाचा दिवस आहे. यानंतर थोड्याच वेळात एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. असे असताना राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगानामध्ये कोणाची सत्ता येणार, कोणाची सत्ता जाणार याचे ठोकताळे बांधले जात आहेत.
प्रत्येक पक्ष आपलाच विजय होणार असे सांगत असला तरी लोकांच्या मनात काय आहे, हे थोड्याच वेळात समजणार आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यांतच पंतप्रधान मोदींनी लक्ष केंद्रीत करत सभा घेतल्या होत्या. मोदींनी चार राज्यांत ४० सभा घेतल्या आहेत. त्यातले त्यात मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक १४ सभा झाल्या आहेत. या राज्यांतीन निवडणुकांचा तीन डिसेंबरला निकाल येणार आहे.
चार राज्यांमध्ये आधीच मतदान झाले होते. तेलंगानामध्ये 119 मतदारसंघांमध्ये काही घटना वगळता शांतते मतदान होत आहे. राजस्थानमध्ये २०० पैकी १९९ जागांवर मतदान झाले आहे. एका मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचे निधन झाल्याने तेथील मतदान घेण्यात आले नाहीय.
पाचपैकी तीन राज्यांच्या निकालाकडे देशाचे सर्वाधिक लक्ष लागलेले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगाना. यामध्ये अनुक्रमे काँग्रेस, भाजपा आणि बीआरएस सत्तेत आहे. हे तिन्ही पक्ष एकमेकांना सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी उतावीळ झाले आहेत. निवडणूक आयोगाने आतापर्यंत पाचही राज्यांत करोडोंच्या भेटवस्तू, ड्रग्ज, दारू आणि पैशांच्या स्वरुपात १७६६ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. याचा वापर मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला जाणार होता.