अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस वारंवार जीएसटीवरुन भाजपा सरकारवर निशाणा साधत आहे. गुजरातमधील प्रचारसभेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी काही ठराविक उद्योजकांना फायदा पोहोचवण्यासाठी 'गब्बर सिंग'ची मदत केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. 'गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष निवडणूक जिंकणार असून, कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही. वादळ येत आहे', असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
'आम्हाला एकच जीसएटी हवा आहे. गब्बर सिंह टॅक्स नको', असं पुन्हा एकदा राहुल गांधींनी यावेळी बोलताना सांगितलं. राहुल गांधींनी आरोप केला की, 'मोदींनी आपल्या पाच ते दहा मित्रांना 55 हजार कोटी रुपये दिले आहेत'. गुजरातमध्ये एका आईला आपल्या मुलाला इंजिनिअर बनवण्यासाठीही लाच द्यावी लागते असा आरोप राहुल गांधींनी केला.
राहुल गांधींनी यावेळी गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास 10 दिवसांत कर्जमाफी करण्याची योजना आखली जाईल असं आश्वासन दिलं. शेतक-यांच्या मुद्यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित भाजपावर टीका करताना म्हटलं की, 'शेतक-यांची परिस्थिती वाईट आहे आणि मोदींनी 10 उद्योजकांचं 1 लाख 30 हजार कोटींचं कर्ज माफ केलं आहे'.
गुजरातच्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बोलले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन आणि पाकिस्तानबद्दल बोलत असतात, पण गुजरातबद्दल नाही'. 'भाजपाने अद्याप आपला घोषणापत्र जाहीर केलेलं नाही. तुमच्यासाठी त्यांना काय करायचं आहे हे अद्याप सांगू शकलेले नाहीत', असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींनी यावेळी मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. 'काँग्रेस पक्ष पंतप्रधान पदाचा आदर करतो. काँग्रेस पक्षात कोणीही असभ्य भाषा वापरत पंतप्रधानांवर टीका करु शकत नाही. मोदीजी आपल्याबद्दल काहीही बोलू शकतात. म्हणून मणिशंकर अय्यर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे', असं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना 'नीच' असा उल्लेख केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई होण्याआधी मणिशंकर अय्यर यांनी माफी मागत आपली हिंदी खराब असून, कोणाला त्याच्यावर आक्षेप असेल तर माफी मागतो असं म्हटलं होतं.