मोदी स्वत:ला सर्वज्ञानी समजू लागले आहेत; राहुल गांधी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 04:59 AM2018-12-02T04:59:08+5:302018-12-02T04:59:26+5:30
या खात्यांना मंत्री असूनही स्वत: मोदीच प्रत्येक बाबतील हस्तक्षेप करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केली.
उदयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ला सर्वज्ञानी समजतात. संरक्षण खात्यातील आपल्यालाच समजते, अर्थ खात्याविषयी आपल्या तुलनेत इतरांना काहीच कळत नाही, परराष्ट्र खात्याविषयीही केवळ आपणच सारे जाणतो, अशा पद्धतीने ते वागत आहेत. या खात्यांना मंत्री असूनही स्वत: मोदीच प्रत्येक बाबतील हस्तक्षेप करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केली.
राहुल गांधी यांनी येथे उद्योजक व व्यापारी यांच्याशी त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यांनी राज्यात तीन प्रचार सभाही घेतल्या. हिंदुत्ववाद म्हणजे काय, हेही केवळ आपल्यालाच समजते, अशी त्यांची धारणा आहे. मात्र त्यांना स्वत:ला हिंदुत्व म्हणजे काय ते कळलेले नाही. त्यांच्यापेक्षा सामान्यांना हिंदू व हिंदुत्वाची अधिक माहिती असते. त्यामुळे मोदी कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत, हेच समजेनासे झाले आहे, असा टोलाही राहुल गांधी यांना लगावला.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचेही पंतप्रधान मोदी यांनी राजकारण केले. उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी लष्करी कारवाईचे राजकीयीकरण केले. त्याआधी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही याप्रकारे सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते. पण डॉ. मनमोहन सिंग वा काँग्रेसने लष्करी कारवाईचे कधीच राजकारण केले नाही, अशी टीका गांधी यांनी केली.
भिलवाडामधील सभेत राहुल गांधी यांनी नोटाबंदी व जीएसटीच्या निर्णयामुळे शेतकरी, गरीब व सामान्यांचे हाल झाल्याची टीका केली. या निर्णयांमुळे अनेक छोटे व मध्यम उद्योग बंद पडले आणि लाखो लोकांचा रोजगार गेला, असा आरोप राहुल गांधी यांनी सभेमध्ये केला.
तरुण बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देण्यात पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री वसुंधरा राजे अपयशी ठरल्याचे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी यापुढे लोकांना ‘मन की बात’ ऐकवण्याऐवजी जनतेच्या मनातील बात ऐकावी.