नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेत तेथील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र, पंतप्रधान पदावर बसल्यापासून नरेंद्र मोदींनी देशात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, त्यावरुन त्यांच्यावर नेहमीच टीका होते. मोदींनी ९ वर्षात अनेक कार्यक्रम, सभा, रॅली, भाषणे केली. मात्र, एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यावरुन, राहुल गांधींसह इतरही विरोधकही त्यांना लक्ष्य करतात. पण, मोदींनी अमेरिकेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. त्यावरुन, आता एमआयएमचे खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी मोदींना प्रश्न विचारला आहे.
मोदींनी अमेरिकेत पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना, अल्पसंख्यांकांसोबत भारतात कुठलाही भेदभाव केला जात नसल्याचं म्हटलं. त्यावरुन, औवेसींनी मोदींना काही प्रश्न विचारले आहेत. देशात भाजपचे ३०० मंत्री आहेत, मग त्यापैकी एकही मंत्री मुस्लीम का नाही? असा थेट सवाल औवेसींनी विचारला. तसेच, ९ वर्षांत पहिल्यांच मोदींनी पत्रकार परिषद घेतली, तीही विदेशात. मोदी भारतात पत्रकार परिषद का घेत नाहीत, असा सवालही औवेसींनी विचारला.
अल्पसंख्यांकांच्या भेदभावावरुन मोदींना प्रश्न
भारतातील अल्पसंख्याक समुदायाबद्दल अमेरिकेतील पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला होता. लोक म्हणतात.. भारतातील अल्पसंख्यांक समुदायासोबत भेदभाव केला जातो, असं ह्युमन राईट्स आणि लोकांचं म्हणणं आहे? असा प्रश्न विचाारण्यात आला. त्यावर, मोदींनी उत्तर दिलं होतं. भारत हा लोकशाहीप्रधान देश असल्याचं म्हटलं. मला आश्चर्य होतंय की तुम्ही म्हणता लोकं म्हणतात.. लोकं म्हणतात... पण भारत लोकशाहीप्रधान देश आहे. जसं की राष्ट्रपती जो बायडन यांनी म्हटलं की, भारत आणि अमेरिका दोन्ही देशांचा डीएनए लोकशाही आहे, लोकशाही आमच्या रक्तात आहे, लोकशाही आम्ही जगतो, आमच्या पूर्वजांनी संविधानच्या रुपाने ते शब्दबद्ध केलं आहे, असे मोदींनी म्हटले.