ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - पर्यावरणावर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. मात्र मागच्या काही वर्षांपासून पर्यावरणाचे दुष्परिणाम मानवी जीवनावर दिसून येत आहेत. आज या समस्येवर उपाय शोधण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
संसद सदस्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या इलेक्ट्रीक बसला हिरवा कंदिल दाखवल्यानंतर बोलताना त्यांनी वाढत्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली. केंद्रीय रस्ते-वाहतूक मंत्रालयाने खासदारांना संसदेत येण्या-जाण्यासाठी इलेक्ट्रीक बसेस दिल्या आहेत. प्रदूषण रोखणा-या या बसेस पर्यावरणाला अनुकूल आहेत.
पॅरिसमध्ये झालेल्या पर्यावरण परिषदेचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, भारत, अमेरिका आणि फ्रान्सने बिल आणि मेलिंड गेटस फाऊंडेशनच्या मदतीने दोन महत्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत. भारत, अमेरिका आणि फ्रान्स पर्यावरणाला अनुकूल ग्रीन तंत्रज्ञान विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.