ऑनलाइन टीमबिजींग, दि. - नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यास चीन व भारतामधील संबंध सुधारतील अशी आशा चीनमधील सरकारी वृत्तपत्राने वर्तवली आहे. तर दुसरीकडे मोदींच्या विजयामुळे पश्चिमी देशांना धक्का बसेल असे या वृत्तात म्हटले आहे. चीनमधील सत्ताधारी कम्यूनिस्ट पक्षाच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रात मोदींविषयी एक लेख छापण्यात आला आहे. या लेखात भारतीय निवडणुका व त्याचे चीनवरील परिणाम याविषयी विश्लेषण करण्यात आले आहे.मोदी हे अत्यंत व्यवहारी दृष्टोकन असलेले व्यक्तीमत्त्व असून चीनमधील अनेक उद्योजकांनी गुजरातमध्ये गुंतवणूक केली आहे. मोदींनी चीनसोबत नेहमीच चांगले संबंध ठेवल्याने ते पंतप्रधान झाल्यास भारत व चीनमधील संबंध आणखी सुधारतील अशी आशा वर्तवली जात आहे. म्हणूनच अमेरिका व अन्य पश्चिमी देशांना मोदींच्या विजयामुळे धक्का बसेल असेही या लेखात म्हटले आहे.दरम्यान, अरुणाचल प्रदेशच्या प्रश्नावर मोदींनी चीनवर टीका केली होती. त्यामुळे आता मोदी या लेखाविषयी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.