ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 10 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची खिल्ली उडवत गुगलवर सर्च केलं तर सर्वात जास्त जोक काँग्रेस नेत्यावर असल्याचं बोलले आहेत. उत्तरप्रदेशातील बिजनोर येथे प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना कायदा - सुव्यवस्था बिघडण्यासाठी अखिलेश यादवच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच नाव न घेता काँग्रेस नेता बालिश वर्तन करत असल्याचं बोलले आहेत. 'काँग्रेसमधील एक नेता आहे जो आपल्या बालिश वागण्यासाठी ओळखला जातो. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर सर्वात जास्त जोक तुम्हाला त्याच्याच नावे सापडतील. दुस-या कोणत्याच नेत्यावर इतके विनोद नाहीत जितके त्याच्यावर आहेत', असं म्हणत मोदींनी राहुल गांधींना टार्गेट केलं.
Agar aap Google par jaayen aur dekhen, shayad kisi neta par itne chutkule nahi honge jitne Congress ke neta par hain: PM Modi in Bijnor pic.twitter.com/UKpHVzBluU— ANI UP (@ANINewsUP) February 10, 2017
'त्यांच्या या अशा वागण्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही त्यांच्यापासून अंतर ठेवून असतात. पण अखिलेश यादव तुम्ही त्यांच्यासोबत हात मिळवलात. तुमच्या ज्ञानावर मला आता शंका येऊ लागली आहे', असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला आहे.
'अखिलेश सरकार विरोधकांची कोंडी करण्यासाठी सत्तेचा वापर करत आहे. आम्ही सत्तेत आल्यास कारवाई करु', असं आश्वासन मोदींनी यावेळी दिलं. 'मतदानाच्या एक दिवस आधी समाजवादी पक्षाने आपल्या पराभवाला कारणीभूत ठरणा-यांची यादी बनवून त्यांना जाणुनबुजून अटक केली', असा आरोप मोदींनी केला. 'प्रत्येक ठिकाणी कमळ फुलत असल्याचं पाहून एकमेकांच्या विरोधात लढणारे काँग्रेस आणि सपा एकत्र आले आहेत', असं मोदी बोलले आहेत.