हरीश गुप्ता ।
नवी दिल्ली : विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी बाबरी मशीद खटल्यात ३२ आरोपींना निर्दोष सोडले; परंतु नरेंद्र मोदी यांनी अयोध्या खटल्यात गुंतलेल्या भाजपच्या बहुतेक नेत्यांना हातभर लांबच ठेवले. उमा भारती वगळता इतर कोणीही मोदी यांची पसंती मिळवू शकले नाही. मोदी यांच्या पहिल्या कारकीर्दीत भारती थोड्याशाच कालावधीसाठी केंद्रात मंत्री होत्या.
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, विनय कटियार कोणीही मोदींची पसंती प्राप्त करू शकले नाही. कल्याण सिंह यांना उशिराच राजस्थानचे राज्यपाल बनवले गेले. तेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी त्यांना संधी देण्याची विनंती केल्यामुळे. त्यांंना दुसऱ्यांदा तीच संधी नाकारली गेली. कल्याण सिंह यांना समाधान म्हणजे त्यांच्या मुलाला लोकसभेचे दिले गेलेले तिकीट. विनय कटियार लोकसभेचे सदस्य होते व इतर मागासवर्गांत लोकप्रिय नेते असूनही त्यांना २०१८ मध्ये राज्यसभेचे तिकीट नाकारले गेले व त्यांना कधीही मंत्री केले गेले नाही.उमा भारती यांना नंतर मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. नंतर त्यांना भाजपचे उपाध्यक्षपद दिले गेले व २०१९ मध्ये लोकसभेचे तिकीट नाकारले गेले.नुकतेच त्यांना पक्षाच्या पदावरूनही दूर केले गेले. गेल्या ५ आॅगस्ट रोजी मोदी अयोध्येत राममंदिराच्या पायाभरणीसाठी गेले असताना भारती यांनी जे केले, त्यामुळे मोदी कमालीचे नाराज आहेत, असे सूत्रांनी सांगितले. अयोध्या प्रकरणात भाजपचे तरुण नेते म्हणजे ६० वर्षांचे पवन पांडेय. ते उत्तर प्रदेशात आमदार असले तरी नशीब त्यांच्या बाजूने नाही. डॉ. राम विलास वेदांती यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. नंतर त्यांना श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य केले गेले.