लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ‘विकास भारत संकल्प यात्रा’ ही केवळ सरकारचीच नव्हे तर देशाची यात्रा झाली आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण सक्षम झाले तरच देश शक्तिशाली होईल, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. पूर्वीच्या सरकारांमध्ये शेतकऱ्यांना सक्षम करण्याची चर्चा केवळ शेतमालाचे उत्पादन आणि विक्री यापुरतीच मर्यादित होती, मात्र सध्याचे केंद्र सरकार लहान शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सतत काम करत आहे, असे ते म्हणाले.
मोदींनी ‘विकास भारत संकल्प यात्रे’च्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, पात्र व्यक्ती कोणत्याही सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये हा ‘मोदीची गॅरंटी’च्या या यात्रेचा उद्देश आहे. अनेक वेळा जनजागृतीअभावी काही लोक सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. अशा लोकांपर्यंत पोहोचणे ही सरकारची जबाबदारी आहे. आज मोदींच्या गॅरंटीची देशातच नव्हे तर जगात खूप चर्चा होत आहे, असे ते म्हणाले.
- २कोटी पेक्षा गरीब लोकांच्या आरोग्याची तपासणी ‘विकास भारत संकल्प यात्रे’दरम्यान करण्यात आली.
- १कोटी लोकांची टीबी आजाराचीही तपासणी करण्यात आली.
- २२ लाख लोकांची सिकलसेल, ॲनिमियाची चाचणी करण्यात आला.
- ५० दिवस यात्रेला पूर्ण
- ११ कोटी लोक या यात्रेत सहभागी
- १० वर्षांत १० कोटी महिला बचत गटांमध्ये सहभागी
प्रत्येक शेतकऱ्याला केंद्र सरकारने दिले किमान ३० हजार रुपये
- पंतप्रधान म्हणाले की आधीच्या सरकारांच्या काळात शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रत्येक अडचण दूर करण्यासाठी आमच्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.
- पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला किमान ३०,००० रुपये देण्यात आले आहेत. मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण या चार सर्वात मोठ्या जाती आहेत आणि जेव्हा त्यांना सशक्त केले जाईल, तेव्हा मजबूत भारत तयार होईल.
आधीच्या पिढ्यांनी जे भोगले...
- मोदी म्हणाले, ‘आधीच्या पिढ्यांनी जे जीवन जगले ते आताच्या आणि भावी पिढ्यांनी जगू नये, अशी आमची सरकारची इच्छा आहे.
- देशाच्या मोठ्या लोकसंख्येला छोट्या छोट्या दैनंदिन गरजांच्या संघर्षातून बाहेर काढायचे आहे.
- यात्रा सुरू झाल्यापासून उज्ज्वला कनेक्शनसाठी १२ लाख नवीन अर्ज आले आहेत आणि सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री स्वनिधीसाठी लाखो अर्ज आले आहेत.
- आज डॉक्टर गरीब, दलित, वंचित आणि आदिवासींच्या दारापर्यंत पोहोचत आहेत, जे पूर्वीच्या सरकारांनी आव्हान मानले होते.’