वडनगर/ अहमदाबाद - गुजरातमध्ये विकास वेडा झाला आहे, अशी टीका करत भाजपाला अडचणीत आणणाऱ्या काँग्रेससह अन्य विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार पलटवार केला. आपल्या जन्मगावी वडनगर येथे गेलेल्या मोदींनी आपल्या सरकारने केलेल्या विकासकामांची यादी वाचत काँग्रेसवर टीका केली. तसेच मोदींनी सभेला उपस्थित असणाऱ्यांना गुजरातीमधून विकासाचा अर्थ विचारला. रुग्णालय बांधणे हा विकास नाही काय असे मोदींनी विचारले त्यावर उपस्थितांनी हो असे उत्तर दिले.काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले," अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात आरोग्यविषयक धोरण ठरवण्यात आले होते. त्यानंतर मात्र दहा वर्षे जे सरकार सत्ते होते त्याने हे धोरण गुंडाळून ठेवले. या सरकारला विकासाचे वावडे होते. आता कुठे आमच्या सरकारने नवे धोरण बनवले."यावेळी मोदींनी संपूर्ण गुजरात हगंदारीमुक्त झाल्याचाही आवर्जुन उल्लेख केला, " चांगल्या आरोग्याची हमी केवळ डॉक्टर आणि चांगल्या खाण्यापिण्यावर आधारलेली नसते. तर ती स्वच्छतेवरही अवलंबूनी असते. आज संपूर्ण गुजरात हगणदारीमुक्त झाले आहे. त्यासाठी मी गुजरात सरकारचे अभिनंदन करतो. स्वच्छतेमुळे गरिबांना चांगले आरोग्य मिळेल. त्यासाठी आम्ही हे अभियान सुरू केले. चांगल्या स्वच्छतेमुळे गरिबांचे दरवर्षी 50 हजार रुपये वाचतील." दरम्यान, मोदी मंचावर असताना त्यांचे भाऊ पंकज मोदी मात्र इतर उपस्थितांप्रमाणेच खालील गर्दीत बसले होते. त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपण सर्वसामान्य नागरिक आहोत. कुणी व्हीआयपी नाही, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील त्यांच्या वडनगर या जन्मगावी आले आहेत. पंतप्रधानपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर वडनगरलायेण्याची मोदींची ही पहिलीच वेळ आहे. गावात प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शाळेला भेट दिली. यावेळी ते अत्यंत भावूक झाले होते. शाळेची पायरी चढताच जमीनीवर माथा टेकवला आणि कपाळाला शाळेची माती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज ते त्यांच्या जन्मगावी वडनगरला पोहचले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रस्ताच्याकडेला पंचक्रोशीतील हजारो लोक उभे होते. मात्र गावात जाताच त्यांनी सर्वात आधी त्यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेला भेट दिली आणि शाळेची माती कपाळाला लावली. त्यानंतर शाळेच्या प्रत्येक वर्ग खोल्यात जाऊन पाहणी केली.
मोदींनी काँग्रेसवर केला पलटवार, सांगितला विकासाचा अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 2:23 PM