ऑनलाइन लोकमत
अस्ताना, दि. 9 - भारत आणि चीनमधील तणाव अद्यापही कायम असून दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली आहे. शांघाय सहकार्य परिषद (एससीओ) शिखर संमेलनादरम्यान दोघांनी एकमेकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या बैठकीत दोन्ही देशाचे अधिकारीही सामील होते. विशेष म्हणजे दोन्ही देशांमध्ये एनएसजी सदस्यता, चीन - पाकिस्तान आर्थिक संबंध, तिबेटियन धर्मगुरु दलाई लामा आणि अरुणाचल प्रदेश सहित अनेक मुद्यांवर मतभेद आहेत.
भेट झाल्यानतंर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत की, "शांघाय सहकार्य परिषद (एससीओ) शिखर संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. भारताच्या एससीओ सदस्यत्वाला पाठिंबा देण्यासाठी तुमच्या प्रयत्नांबद्दल आभार". मोदींनी या बैठकीत अणु पुरवठादार गटात (NSG) सहभागी करुन घेण्याचा मुद्दा उपस्थित केला की नाही हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.
Got the opportunity to meet you again during SCO summit, grateful to you for your efforts and support for India"s SCO membership: PM Modi pic.twitter.com/7aNmEgtqsu— ANI (@ANI_news) June 9, 2017
भारताने गुरुवारीच ही भेट होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. भारताने चीनमधील आयोजित वन बेल्ट वन रोड (OBOR) परिषदेवर बहिष्कार टाकल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात भेट झाली. यावेळी मोदी आणि जिनपिंग यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. भारताने चीन - पाकिस्तानच्या आर्थिक संबंधांवर चिंता जाहीर करत वन बेल्ट वन रोड (OBOR) परिषदेवर बहिष्कार टाकला होता. या परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन सहभागी झाले होते. याशिवाय भारताच्या एनएसजी सदस्यत्वावरुनही चीनसोबत गंभीर मतभेद आहेत.
#WATCH: Prime Minister Narendra Modi meets Chinese President Xi Jinping in Astana. pic.twitter.com/wQ8XnnVTfH— ANI (@ANI_news) June 9, 2017
एससीओत भारताला सदस्यत्व मिळणे महत्त्वाचे आहे. अस्ताना परिषदेत भारताला पूर्ण सदस्यत्व मिळेल, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते. भारताला २००५ पासून एससीओत पर्यवेक्षकाचा दर्जा मिळालेला आहे. पूर्ण सदस्यत्वासाठी भारताने २०१४ मध्ये अर्ज केला होता.
कझाकिस्तानमध्ये मोदी आणि नवाज शरीफ यांची भेट
मोदींनी शी जिनपिंग यांची भेट घेण्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांच्यात कझाकिस्तानमध्ये भेट झाल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शांघाई को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन(SCO)शिखर संमेलनाच्या आधी दोन्ही नेत्यांनी लीडर्स लाऊंजमध्ये एकमेकांना अभिवादन केलं.
2015 ब्रिक्स आणि एससीओच्या बैठकीत मोदी आणि शरीफ यांची भेट झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय करारांवरही सहमती झाली होती. मात्र 2016मध्ये झालेल्या पठाणकोट हल्ल्यानंतर परिस्थिती बिघडली. दोन्ही देशांमध्ये कटुता आली. 2016च्या जुलैमध्येही पुन्हा एकदा नवाज शरीफ आणि मोदी शांघाई सहयोग संघटनेच्या बैठकीत आमने-सामने आले होते. मात्र त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली नाही.