प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये मोदी-मोदीच्या घोषणा, प्रियंकांनी दिले असे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 02:55 PM2019-04-09T14:55:22+5:302019-04-09T14:55:28+5:30
प्रियंका गांधी यांनीही उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे मोठा रोड शो करत कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. मात्र...
बिजनौर (उत्तर प्रदेश) - काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. दरम्यान, आज प्रियंका गांधी यांनीही उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे मोठा रोड शो करत कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. मात्र प्रियंका गांधी यांनी या घोषणाबाजी करणाऱ्यांवर फुलांचा वर्षाव करत त्यांच्या विरोधाचेही स्वागत केले.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपण्यासाठी आता काही तासांचा अवधी राहिला आहे. दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच दिग्गज नेत्यांनी आपापली शक्ती पणाला लावली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या आज बिजनौर येथील काँग्रेस उमेदवार नसिमुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रचारार्थ रोड शो करत होत्या. मात्र या रोड शोवेळी काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर हेच्या घोषणा दिल्या तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा देत त्याला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र प्रियंका गांधी यांनी प्रसंगावधान राखत मोदी-मोदीच्या घोषणा देणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर काँग्रेसचा ध्वज आणि फुलांची उधळण करत अजून घोषणा द्या, असा टोला लगावला.
उत्तर प्रदेशमधील बिजनौर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. येथे काँग्रेसने नसिमुद्दीन सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपाचे कुंवर भारतेंद्र सिंह आणि बसपाचे मलूक नागर यांच्याशी होणार आहे.
दरम्यान, या मतदारसंघात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा रोड शो आणि सभा सोमवारी होणार होती. मात्र पाऊस आणि वादळामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. दरम्यान, आज प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी बिजनौर येथे नियोजित कार्यक्रम पूर्ण केला.