नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे नेहमीच गाजले आहेत. गेल्या 4.5 वर्षांच्या कालावधी मोदींनी तब्बल 92 देशांना भेटी दिल्या आहेत. या 92 देशांच्या भेटीसाठी मोदींच्या विदेश दौऱ्यावर सरकारचे 2021 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यापैकी यंदाच्या वर्षात म्हणजे 2018 मध्ये मोदींनी 14 विदेश दौरे केले आहेत. तर मोदी हे विदेश दौऱ्यांसाठी सर्वात महागडे पंतप्रधान ठरले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे आणि त्यावरील खर्च हा नेहमीच माध्यमांसाठी आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आता, मोदींनी जवळपास आपले परदेश दौरे पूर्ण केले आहेत. यापुढे कुठल्याही परदेश दौऱ्याचे नियोजन मोदींच्या वेळापत्रक नसल्याचे एका संबंधित अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले होते. त्यामुळे गेल्या 55 महिन्यांत मोदींनी केलेल परदेश दौरे आणि त्याचा खर्च याबाबतची माहिती समोर आली आहे. मोदी सरकारला सत्तेत येऊन 4 वर्षे 7 महिन्याचा कालावधी झाला. या कालावधीत मोदींनी 92 विदेश दौरे केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या 55 महिन्यांमधील विदेश दौऱ्यावर 2121 कोटी रुपये खर्च झाले आहेत. जून 2014 मध्ये मोदींनी आपला पहिला विदेश दौरा केला होता. तर 28 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर असा मोदींचा यंदाच्या वर्षातील अखेरचा विदेश दौरा होता. त्यानंतर, मोदी अद्याप परदेश दौऱ्यावर गेले नाहीत. मोदींचे यंदाच्या वर्षात एकूण 14 विदेश दौरे झाले आहेत. मोदींच्या 92 दौऱ्यांच्या खर्चाची सरासरी काढल्यास एका दौऱ्यासाठी जवळपास 22 कोटी रुपये खर्च आला आहे. या तुलनेत डॉ. मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील 5 वर्षांच्या विदेश दौऱ्यावर भारत सरकारने 1350 कोटी रुपये खर्च केला होता. त्यामध्ये डॉ. सिंग यांनी 50 देशांचा दौरा केला आहे.
मोदींच्या विदेश दौऱ्यावर सर्वाधिक खर्च 9 एप्रिल ते 17 एप्रिल 2015 मधील फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांच्या भेटीसाठी आला. या दौऱ्यासाठी चार्टर्ड फ्लाईटसाठी 31.25 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. तर 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2014 ही मोदीच्या विदेश दौऱ्यातील दुसऱ्या क्रमांकाची खर्चित यात्रा ठरली आहे. या दौऱ्यासाठी 22.58 कोटी रुपये खर्च आला. दरम्यान, मनमोहनसिंग यांची सर्वात महागडी विदेश यात्रा 2012 मध्ये ठरली होती. या दौऱ्यासाठी 26.94 कोटी रुपये खर्च आला होता.