नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह वीज पडून झालेल्या दुर्घटनेत तब्बल 129 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर, 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मृत नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करत, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही शोक व्यक्त केला असून नड्डा यांनी स्थानिक भाजापा कार्यकर्त्यांना पीडित कुटुंबीयांना मदत करण्याचं आवाहन केलंय.
बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह वीजेचा कडकडाट सुरु होता. त्यातच, वीज पडून तब्बल 97 जणांचा जीव गेला आहे. तर, उत्तर प्रदेशातही 32 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वीज पडून अनेकांचे निधन झाल्याचे वृत्त समजले. तेथील राज्य सरकार तत्परतेने मदत कार्यात सहभागी झाले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना असल्याचं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
संरक्षणमंत्री राजथानसिंह यांनीही ट्विट करुन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. या घटनेच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाल्याचं राजनाथसिंह यांनी म्हटलंय. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घनटनेतील पीडितांबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना मदत निधी म्हणून तात्काळ 4-4 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत करण्याचे सांगण्यात आले आहे.