- हरिश गुप्ता, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमंत व काळा पैसा लपवून ठेवलेल्यांविरुद्धचा त्यांचा नेहमीचा पवित्रा बदलून त्यात थोडी नरमाई आणली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शनिवारी केलेल्या भाषणात मोदींनी गरिबांच्या कल्याणावर भर दिला व नोटाबंदीमुळे दारिद्र्य निर्मूलनास मोठा हातभार लागेल, असे आश्वासन दिले .डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नोटाबंदीच्या त्रासामुळे पारंपरिक मतदार पक्षापासून दुरावत असल्याकडे लक्ष वेधले. नोटाबंदीनंतर मोदी यांनी ‘कोअर ग्रुप’ची प्रथमच बैठक घेतली व जनतेचा ‘मूड’ काय आहे, याची माहिती घेऊन, त्यानुसार पक्षाच्या ध्येयधोरणांमध्ये काय सुधारणा कराव्या, यावर विचारविनिमय केला. बैठकीत अमित शहा यांनी गरिबांचा कैवार घेताना, पारंपरिक मतदार दुरावणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादित केली. ‘कोअर ग्रुप’च्या बैठकीत सरकारकडून ‘डिजिटायझेशन’वर देण्यात येत असल्याचे समर्थन करण्यात आले. व्यवहार रोखीत करायचे की रोखरहीत मार्गांनी हे ठरविण्याचे स्वातंत्र्य लोकांना असावे, असे मत पडले. ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत, तिथे पुरेशा प्रमाणात चलनी नोटा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. - मोदी यांनी त्यांच्या भाषणात श्रीमंत, करचुकवे, काळा पैसेवाले इत्यादींवर नेहमीप्रमाणे घणाघाती हल्ला केला नाही किंवा गरिबांनी त्यांच्या ‘जन-धन’ खात्यांमध्ये इतरांनी लबाडीने भरलेले पैसे त्यांना अजिबात परत करू नका, असे आवाहनही केले नाही. एवढेच नव्हे, तर कार्यकारिणीने संमत केलेल्या आर्थिक ठरावातही गरिबांचे लांगुलचालन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या धाडसी निर्णयाने या वर्गाचे कल्याण होईल, असा दावाही करण्यात आला.- पक्षाध्यक्ष अमित शहा आणि अरुण जेटलींच्या भाषणांमध्येही विरोधी पक्षांवर नेहमीप्रमाणे सडकून टीका नव्हती. त्याऐवजी दोघांनीही नोटाबंदीमुळे प्रामाणिक लोकांचा कसा लाभ होणार आहे, याचा सविस्तर ऊहापोह केला व या निर्णयाने झालेला त्रास हा तात्पुरता असल्याचे सांगितले.कोअर ग्रुपच्या बैठकीनंतर सूर बदलला...पक्षातील वरिष्ठ सूत्रांनुसार, भाजपाच्या भूमिकात दिसून आलेला हा बदल अचानक झालेला नाही. पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या ‘कोअर ग्रुप’ची बैठक गेल्या महिन्यात घेतली, तेव्हाच या बदलाची सुरुवात झाली. मे २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच हा ‘कोअर ग्रुप’ स्थापन करण्यात आला असून, गरजेनुसार त्याच्या बैठका होत असतात. स्वत: पंतप्रधान मोदी, भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा, वित्तमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंग, भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी आणि नगरविकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू असे त्याचे सहा सदस्य आहेत.पंतप्रधानांचे कौतुक...ग्रुपच्या बैठकीत राजनाथ सिंग व गडकरी यांनीही आपापली मते मांडली, तर नायडू यांनी पंतप्रधानांचे कौतुक करून देश त्यांच्यामागे उभा असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी ३१ डिसेंबरला भाषण करून जाहीर केलेल्या विविध सवलती व योजना हाही पक्षाच्या पारंपरिक मतदारांना फुंकर घालण्याचाच प्रयत्न होता. तो ‘कोअर ग्रुप’मधील चर्चेचाच परिपाक होता. म्हणूनच व्यापारी वर्गाला खूश ठेवण्यासाठी काही सवलती व योजना जाहीर केल्या गेल्या व ४० टक्के नव्या नोटा ग्रामीण भागांत पोहोचविण्याचे निर्देश रिझर्व बँकेमार्फत दिले गेले.या हल्लेबाज सरकारपासून देश वाचविण्यासाठी राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरून दूर करून एक राष्ट्रीय सरकार स्थापन करावे. त्याचे नेतृत्व लालकृष्ण आडवाणी, राजनाथ सिंग किंवा अरुण जेटली यापैकी कोणाकडे तरी असावे. सध्या देशात जे काही चालले आहे, ते पुढील अडीच वर्षे चालू राहू दिले शकत नाही. -ममता बॅनर्जीकोणत्याही कारणाशिवाय दररोज नवा तमाशा करीत असल्याने, ममता बॅनर्जी या आता देशात एक विनोदाचा विषय झाल्या आहेत. त्यांनी विश्वासार्हता आणि राजकारणातील पत गमावली आहे.-एस. प्रकाश, भाजपा नेते