ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २ - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जातीयवादी नेते असल्याचा आरोप चोहोबाजूंनी होत असतानाच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी मात्र मोदींची पाठराखण केली आहे. मोदी हे जातीयवादी नसून त्यांना आणखी काही वेळ देण्याची गरज आहे. ते भाजपातील वाचाळवीरांवर लगाम लावतीलच असे सईद यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील वाढत्या असहिष्णूतेवरुन विरोधकांनी नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. मोदी जातीयवादी असल्याचा आरोपही केला जात असला तरी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद हे मित्रपक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. सईद यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींची जातीयवादी नेते नाही, त्यांना आणखी वेळ द्या असे म्हटले आहे. मोदी हे वादळी व्यक्तिमत्व असून त्यांना पर्याय नाहीच. मोदी हे भ्रष्टाचारी नाहीत. भूसंपादन विधेयक कदाचित चुकीचेही असेल, जीएसटी विधेयकही खोळंबले आहे. पण दुरदृष्टीचा विचार करता मोदी हे चांगले नेते आहे अशी स्तुतीसुमने त्यांनी उधळली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी दिवसांमध्ये काश्मीर दौ-यामध्ये असून या दौ-यात मोदी जम्मू काश्मीरसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुफ्तींच्या विधानावरुन राजकीय चर्चा रंगू लागली आहे.