ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - गुजरात भाजपमध्ये नेतृत्व बदल होणार आहे. आनंदीबेन पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी टि्वटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आज गुजरात जळत आहे या परिस्थितीला आनंदीबेन पटेल जबाबदार नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत असा आरोप राहुल यांनी केला आहे. आनंदीबेन पटेल यांची मुख्यमंत्रीपदाची दोनवर्ष नव्हे तर, नरेंद्र मोदींचे तेरावर्षांचे शासन गुजरातमधील आजच्या परिस्थितीला जबाबदार आहे असा आरोप राहुल यांनी केला आहे. आनंदीबेन यांना बळीचा बकरा बनवून भाजप वाचू शकत नाही असे राहुल यांनी म्हटले आहे.
13 years of Modi rule, not 2 years of Anandiben are responsible for Gujarat burning. Sacrificing the scapegoat won't save the BJP— Office of RG (@OfficeOfRG) August 2, 2016
दोनवर्षांपूर्वी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आनंदीबेन पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्री निवड झाली. मोदींच्या विश्वासू सहकारी असल्यामुळे त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. आनंदीबेन पटेल यांनी आता स्वत:च त्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना केली आहे.