नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. याच दरम्यान सीतारामन यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अर्थमंत्र्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या 'हम दो हमारे दो' विधानावरून सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी नेहमीच पंतप्रधानांचा अपमान केला आहे. मग ते सद्य पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग.. माजी पंतप्रधान परदेशात गेले असताना राहुल गांधींनी त्यांच्याकडून आणण्यात आलेला अध्यादेश फाडून फेकून दिला होता, असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींच्या 'हम दो, हमारे दो' या संसदेतील वाक्यावरही अर्थमंत्र्यांनी हल्लाबोल केला आहे. 'हम दो, हमारे दो' तुमच्याकडेच आहे. दोन लोक पक्ष सांभाळणार आणि दोन पक्षातील बाहेरचं सगळं. तसेच एका पक्षाच्या सरकारमध्ये 'जावयाला' अनेक राज्यांत (राजस्थान, हरयाणा) जमिनी मिळाल्या. मी याची अधिक माहिती तुम्हाला देऊ शकते. 'हम दो, हमारे दो' मध्ये जावयाची जमीन परत करण्याचीही घोषणा केली असती तर बरं झालं असतं. मात्र असं काहीही घडलेलं नाही. आमचा पक्ष असं करत नाही. पंतप्रधान स्वनिधी योजना याचा ट्रेलर आहे. या योजनेद्वारे छोट्या छोट्या व्यापाऱ्यांची मदत करण्यात आली असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांना मुद्दा बनवणाऱ्या काँग्रेसने अनेक राज्यांत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. काँग्रेसने निवडणूक जिंकण्यासाठी शेतकरी मुद्यावर यू-टर्न घेतला आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानात त्यांच्या निवडणुकीतील घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही. आम्हाला अपेक्षा होती की पंजाब सरकार शेतकऱ्यांना दिलासा देईल. तीन कायद्यांतील काही त्रुटी निदर्शनास आणून देतील. दाखवून देतील की हे कायदे नेमके कसे शेतकरीविरोधी आहेत. असं काहीही घडलं नाही असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज कोण घेतं, 'जावई' का?; निर्मला सीतारामन यांचा हल्लाबोल
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी राज्यसभेत मुद्रा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर निशाणा साधला. "मुद्रा योजनेअंतर्गत 27 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेची कर्ज देण्यात आली. ही कर्ज कोणी घेतली जावयानं का?," असं म्हणत सीतारामन यांनी हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधत जावई हा शब्द काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही. जावई प्रत्येक घरात असतो परंतु काँग्रेससाठी जावई (दामाद) हे एक विशेषनाम आहे, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.