नवी दिल्ली - पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी हेच योग्य पसंती असल्याचं लोकांमधून केलेल्या सर्व्हेतून पुढे आलंय. तर गृहिणींमध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत फारच कमी फरक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीवोटर -आयएएनएस यांनी लोकांमध्ये जाऊन सर्व्हे केला आहे.
63.6 टक्के बेरोजगार युवकांनी देशाचा पुढील पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या बाजूने कौल दिला आहे तर 26 टक्के बेरोजगार युवकांनी राहुल गांधी यांच्या नावाला पंतप्रधानपदासाठी पसंती दिली आहे. त्याचसोबत 43.3 टक्के गृहिणी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी योग्य असल्याचं सांगितलं आहे तर याच तुलनेत 37.2 टक्के गृहिणींनी राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य आहे असं सांगितलं. गृहिणी वर्गात राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील लोकप्रियतेची तुलना इतर वर्गापेक्षा फारच कमी आहे.
61.1 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर 26 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना राहुल गांधी यांना पंतप्रधान पाहायला आवडेल असं सांगितले. गृहिणींसोबतच श्रमिक आणि सामान्य मजूर वर्गात राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढल्याचे दिसून आलं. 35.4 टक्के भूमिहीन शेतकरी मजूर वर्गाने राहुल गांधी यांच्या नावाला पंतप्रधानपदासाठी प्राधान्य दिलं आहे. तर 48.2 टक्के शेतकरी मजूरांनी मोदींना पसंती दिली आहे. सामान्य मजूर वर्गातील 35 टक्के लोकांनी राहुल गांधी यांनी पुढील पंतप्रधान व्हावं असं सांगितलं तर 48.9 टक्के जणांनी नरेंद्र मोदी यांनीच देशाचं पंतप्रधान व्हावं यासाठी मोदींना साथ दिलीयं.