नवी दिल्ली: अठरापगड कर समायोजित करून संपूर्ण देशासाठी ‘वस्तू व सेवाकर’ नावाची नवी अप्रत्यक्ष करपद्धती लागू केल्याचा रविवारचा वर्षपूर्ती दिन ‘जीएसटी दिन’ म्हणून साजरा करून सरकारने एकीकडे स्वत:ची पाठ थोपटून घेतली, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मर्सिडिस मोटार व दूध यांच्यावर सारखाच कर लावला जाऊ शकत नाही,’ असे सांगून ‘जीएसटी’च्या एकसमान दराची शक्यता फेटाळून लावली.‘जीएसटी दिना’च्या सरकारी कार्यक्रमात मोदी स्वत: सहभागी झाले नाहीत. मात्र, ‘स्वराज्य’ साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी आपले विचार सविस्तर मांडले. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी घराबाहेर न पडणाऱ्या वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मात्र, या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने सहभाग घेतला. प्रकृतीने कृश झालेल्या व देहबोलीतून थकवा जाणवणाºया जेटलींचे दोन महिन्यांतील हे पहिलेच सार्वजनिक दर्शन होते.‘स्वराज्य’ने प्रसिद्धीस दिलेल्या मुलाखतीच्या लेखी तर्जुम्यानुसार मोदी म्हणाले की, ‘जीएसटी’मध्ये सर्व प्रकारच्या वस्तू व सेवांसाठी कराचा एकसमान दर ठेवणे अगदी सोपे झाले असते, पण तसे केल्याने खाद्यपदार्थांवर अजिबात कर लावायचा नाही, असे करता आले नसते. दूध आणि मर्सिडिस मोटार यांच्यावर एकाच दराने कर कसा काय लावता येईल?फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये जेटली यांनीही एकसमान दराची कल्पना चुकीची असल्याचे म्हटले.मोठा फटकामोदी म्हणाले की,आम्ही ‘जीएसटी’चा फक्त एकच दर ठेवू, असे आमचे काँग्रेसवाले मित्र म्हणतात. म्हणजेच त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, सध्या खाद्यपदार्थ व अत्यावश्यक वस्तूंवर शून्य ते ५ टक्के ‘जीएसटी’ आहे, त्यावर ते १८ टक्के कर लावणार, पण एकसमान दर लावल्याने अन्नपदार्थ व इतर आवश्यक वस्तू महाग होतील व त्याची झळ गरिबांना बसेल.आम्ही संघिय सहकार्याच्या भावनेतून राज्यांना विश्वासात घेतले व आधीच्या सरकारला जे जमले नाही, ते सामंजस्य निर्माण करून ‘जीएसटी’ यशस्वी केले, असा दावा करून या नव्या पद्धतीने देशाचे कसे भले होणार आहे, याचे त्यांनी अनेकमुद्दे मांडले.
एकसमान जीएसटी दराची शक्यता मोदींनी फेटाळली, समान दराची झळ गरिबांना बसेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 5:11 AM