लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अयोध्या विकास योजनेची समीक्षा केली. रामाची ही नगरी अध्यात्मिक आणि जागतिक पर्यटन केंद्र म्हणून समोर यायला हवे त्यासाठी एका स्मार्ट शहराच्या स्वरुपात याचा विकास व्हायला हवा, असे मतही व्यक्त केले.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अयोध्येशी संबंधित विकासाच्या अनेक योजनांचे सादरीकरण अधिकाऱ्यांनी केले. मोदी म्हणाले की, अयोध्येचा विकास सर्वांगीण प्रकारे व्हावा जेणेकरुन आगामी पिढ्यांना त्यांच्या जीवनात किमान एकदा तरी अयोध्येची यात्रा करण्याची इच्छा व्हायला हवी. अयोध्येच्या प्रगतीला नवे परिमाण देण्याची वेळ आता आली आहे. ज्या प्रकारे भगवान राम यांच्यामध्ये लोकांना एकत्र आणण्याची क्षमता होती. त्याचप्रकारे सर्वांच्या सहभागातून ही कामे व्हायला हवीत. विमान तळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, रस्ते आणि महामार्गांच्या विकासाशी संबंधित योजनांवर यावेळी चर्चा झाली. एक हरित नगर भाविकांसाठी वसविण्यावरही चर्चा झाली. या ठिकाणी आश्रम, हॉटेल आदी सुविधा असतील.