Rahul Gandhi BJP : सध्या देशातील राजकारणात राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्य आणि अदानी प्रकरणाचीच चर्चा सुरू आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याच दोन मुद्द्याचे पडसाद उमटत आहेत. या दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधीकर्नाटकच्या दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी बेळगावमध्ये सभा घेतली आणि भाजपवर जोरदार टीका केली.
राहुल यांचा भाजपवर हल्लाबोल
यावेळी राहुल यांनी राज्यातील तरुणांना अनेक आश्वासने दिलीच, पण भाजपवरही जोरदार निशाणा साधला. कर्नाटकातील भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचा टोला राहुल यांनी लगावला आहे. भाजप सरकार तुम्हाला रोजगार देऊ शकत नाही, तुम्हाला त्रास होत आहे, तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्ही प्रत्येक बेरोजगार पदवीधराला दरमहा 3000 रुपये आणि पदविकाधारकाला 1500 रुपये देऊ. आम्ही पुढील पाच वर्षांत कर्नाटकात 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे राहुल गांधीं म्हणाले.
राहुल यांनी यावेळी राज्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दाही उपस्थित केला. कर्नाटकातील भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे त्यांनी म्हटले. या सरकारमध्ये काहीही करायचं असेल तर '40% कमिशन' द्यावे लागते. विशेष म्हणजे, 40% कमिशनचा आरोप यावेळी कर्नाटकातील प्रत्येक काँग्रेस नेत्याकडून भाजपवर केला जात आहे. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, कर्नाटकात 40 टक्के कमिशन थेट भाजप नेत्यांना जाते आणि 60 टक्के कमिशन पार्टी फंडात जाते. यावेळी काँग्रेसने 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणाही केली आहे.
लंडन वादावर स्पष्टीकरणभ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करण्याबरोबरच राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरुनही खडे बोल सुनावले. भाजप-आरएसएसवर टीका केल्याने देशाचा अपमान होत नाही, असे राहुल यांनी ठणकावून सांगितले. देशात करोडो लोक आहेत, हे भाजप-संघ विसरले असल्याचे राहुल म्हणाले. हा देश केवळ संघ, भाजप किंवा मोदींचा नाही. पंतप्रधान, भाजप किंवा संघावर हल्ला म्हणजे देशाचा अपमान होत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.