नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांची छायाचित्रे असलेले बोर्डिंग पास मागे घेण्याचा निर्णय या प्रकरणी प्रचंड टिका झाल्यावर एअर इंडियाने घेतला. या पासमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता.एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जानेवारीत झालेल्या व्हायब्रंट गुजरात परिषदेनिमित्त त्यावेळी हे बोर्डिंग पास छापण्यात आले होते. ती त्रयस्थ व्यक्तीने दिलेली जाहिरात होती. त्याचा एअर इंडियाशी काहीही संबंध नाही. मोदी व रुपानी यांची छायाचित्रे असलेले बोर्डिंग पास केवळ गुजरात नव्हे तर देशभरातील सर्वच विमानतळांवर वापरले जात आहेत.
पंजाबचे माजी पोलीस महासंचालक शशिकांत यांनी त्यांना दिल्लीच्या विमानतळावर मिळालेल्या बोर्डिंग पासचे छायाचित्र सोमवारी टिष्ट्वटरवर झळकवले. दोन्ही नेत्यांची छायाचित्रे व्हायब्रंट गुजरातच्या नावाखाली अशा रितीने बोर्डिंग पासवर कशी काय प्रसिद्ध करता येऊ शकतात? या गोष्टी घडत असूनही काहीही न पाहिल्यासारखे, काहीही न बोलणाऱ्या निवडणूक आयोगावर जनतेचा पैसा का खर्च करायचा? असे सवालही त्यांनी केले होते.रेल्वे तिकीटांवरही पंतप्रधानरेल्वे तिकीटांवर मोदी यांचे छायाचित्र प्रसिद्ध केल्याबद्दल तृणमूलने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही तिकीटे २० मार्च रोजी रेल्वेने मागे घेतली होती. ही त्रयस्थ व्यक्तीने दिलेली जाहिरात आहे असे रेल्वेकडूनही सांगण्यात आले होते.