मोदी म्हणे, फळं सर्वांनी खा, परंतु कामाची चिंता करू नका, राहुल गांधींनी भाजपावर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 04:13 PM2017-11-06T16:13:06+5:302017-11-06T16:17:12+5:30
शिमला- हिमाचल प्रदेशमधल्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीसुद्धा उतरले आहेत. राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशमधल्या सिरमोर जिल्ह्यातील पांवटा साहिब रॅलीला संबोधित केलं आहे.
शिमला- हिमाचल प्रदेशमधल्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीसुद्धा उतरले आहेत. राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशमधल्या सिरमोर जिल्ह्यातील पांवटा साहिब रॅलीला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर निशाणा साधला आहे.
राहुल म्हणाले, गीतेत लिहिलं आहे की, कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका, परंतु मोदीजी सांगतात, फळं सर्वांनी खा परंतु कामाची चिंता करू नका. राहुल गांधींनी गीतेचा हवाला देत मोदींना लक्ष्य केलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जसजशा निवडणुका जवळ येतायत. त्याप्रमाणेच निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आता खुद्द काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. नरेंद्र मोदी कामाची चिंता करत नाहीत, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना खडे बोल सुनावले आहेत.
मोदींनी हिमाचल प्रदेशातील सफरचंदाचं पीक घेणा-या, शेती करणा-या व पर्यटनासाठी काम करणा-यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. रॅलीदरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री वीरभद्र सिंगसह अनेक काँग्रेसचे नेते उपस्थित होते. मनरेगासाठी आमच्या सरकारनं देशाला 35 हजार कोटी रुपये दिले आहेत. परंतु एवढेच पैसे मोदी सरकारनं कंपन्यांना दिले आहेत. हा कोणता विकास मॉडल आहे, असाही सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.
तत्पूर्वी हिमाचल प्रदेशच्या एका रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. मोदी म्हणाले होते, हिमाचल प्रदेशची निवडणूक कोणताही पक्ष लढत नाही, तर हिमाचल प्रदेशची जनता लढतेय. काँग्रेसच्या हुकूमशाहीला धडा शिकवण्याचा निर्णय जनतेनं केला आहे. प्रचारातही मजा येत नाहीये, असंही मोदी म्हणाले होते.