इस्लामाबाद/नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान नॅशनल डे निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला होता. मात्र पाकिस्तान नॅशनल डे निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्याचा दावा पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने केला आहे. इम्रान खानने ट्विट करून ही माहिती दिली आहे. मात्र परंपरेनुसार विविध देशांना सरकारकडून अशा दिवसांनिमित्त औपचारिक शुभेच्छा दिल्या जातात, असे सूत्रांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेल्या शुभेच्छा संदेशांबाबत इम्रान खान याने ट्विट केले आहे. '' मी नरेंद्र मोदी पाकिस्तान नॅशनल डे निमित्त पाकिस्तानी जनतेला शुभेच्छा देतो. उपखंडातील जनतेने दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरणात लोकशाही, शांतता, प्रगतीशील आणि सुखी क्षेत्राच्या विकासासाठी मिळून काम करण्याची हीच योग्य वेळ आहे." अशा शब्दात मोदींनी शुभेच्छा दिल्याचे इम्रानने म्हटले आहे.
त्यानंतर इम्रानने अजून एक ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या शुभेच्छांचे स्वागत केले आहे. सर्व प्रश्न सोडवण्यासाठी व्यापक स्तरावर चर्चेला सुरुवात करण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते, असे इम्रान खान याने सांगितले.