मोदी, शहा स्वत:च्याच काल्पनिक विश्वात मश्गुल - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 06:13 AM2019-12-06T06:13:31+5:302019-12-06T06:13:43+5:30
कोळिकोड (केरळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वत:च्याच काल्पनिक विश्वात मश्गुल असून, बाहेरच्या जगात काय ...
कोळिकोड (केरळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वत:च्याच काल्पनिक विश्वात मश्गुल असून, बाहेरच्या जगात काय घडतेय याची त्यांना सुतराम कल्पना नाही. त्यामुळेच देश सध्या अडचणीत आला आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.
देशाची आर्थिक स्थिती बिकट झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे उद्गार काढले. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्याला राहुल गांधी यांनी गुरुवारपासून प्रारंभ केला. त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च एक काल्पनिक विश्व निर्माण केले.
सर्व देशानेही त्याच विश्वात राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, काल्पनिक गोष्टी वास्तवात उतरत नसल्यामुळे मोदी अडचणीत आले आहेत.
कोणतेही आर्थिक संकट देशावर कोसळले नसल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे. त्याबाबतच्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, काल्पनिक विश्वात रममाण न होता नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या मनातील भावना जाणून घेतल्या असत्या तर ते आज इतके अडचणीत आले नसते. वास्तवापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. (वृत्तसंस्था)
माझ्यावरील खटले पदकांसारखे
- भाजपने देशभरात आपल्यावर दाखल केलेले खटले हे मला सन्मान पदकांसारखे वाटतात, असे राहुल गांधी यांनी सांगितले. ते म्हणाले की, माझ्या विरोधात १५ ते १६ खटले दाखल करण्यात आले आहेत.
- हे लोक जेवढे जास्त खटले दाखल करतील तेवढी माझ्या आनंदात भरच पडेल. काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडीने वन्यामबलम येथे आयोजिलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.