नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देताना निवडणूक आयोगात मतभेद झाल्याच्या वृत्ताच्या संदर्भात काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी शनिवारी सांगितले की, मोदी-शहा जोडीची दहशत अखेर कमी होऊ लागली आहे.महाराष्ट्रातील वर्धा आणि लातूर येथील भाषणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. याप्रकरणी निवडणूक आयोगाने मोदी यांना क्लीन चिट दिली असली तरी आयोगाच्या एका सदस्याने क्लीन चिटला विरोध केल्याचे वृत्त बाहेर आले आहे. मोदी यांनी आचारसंहिता आणि आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केला आहे, असे मत आयोगाच्या एका सदस्याने दिले होते.या पार्श्वभूमीवर चिदम्बरम यांनी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, निवडणूक आयोगात काही तरी जान आली आहे, असे संकेत यावरून मिळतात. ६, १२ आणि १९ मेचा टप्पा जवळ आलेला असताना निवडणूक आयोग कदाचित मोदी आणि शहा यांना समजही देऊ शकतो.आरोप आणि कार्यवाहीराहुल गांधी हे अल्पसंख्याकबहुल वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक का लढत आहेत, असे म्हणत मोदी यांनी राहुल यांच्यावर वर्ध्यातील भाषणात टीका केली होती. लातूर येथील भाषणात मोदींनी बालाकोट एअरस्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावे मते मागितली होती. त्यावरून काँग्रेसने मोदी यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल केल्या होत्या.निवडणूक आयोगाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, आयोगाच्या बैठकीत एका आयुक्तांनी मोदींच्या विरोधात मत व्यक्त केले. त्यामुळे आयोगाने बहुमताच्या आधारे मोदींना क्लीन चिट दिली. तथापि, हा निर्णय निम-न्यायिक (क्वासी-ज्युडिशियल) नसल्यामुळे विरोधी मताची लेखी नोंद घेण्यात आली नाही. निवडणूक आयोग कायदा-१९९१ नुसार, एखाद्या मुद्यावर मतभेद झाल्यास आयोगाने बहुमताच्या आधारे निर्णय घ्यावा, अशी तरतूद आहे. निर्णय प्रक्रियेत मुख्य निवडणूक आयुक्तांसह तिन्ही आयुक्तांना समान अधिकार आहेत.
मोदी-शहा यांची भीती अखेर ओसरू लागली - चिदम्बरम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 6:30 AM