भोपाळ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या पुन्हा सत्ता मिळविण्याच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसला आहे. केंद्रातील सत्तेत मंत्री असलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टीने राज्यात वेगळी चूल मांडायचे ठरविले असून पक्ष 66 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी केली आहे. यामुळे भाजपला आणखी एक मित्रपक्ष रामराम ठोकण्याच्या भुमिकेत आहे.
भाजपशी सकारात्मक बोलणी सुरु असून अद्याप जागा वाटपाबाबत ठरलेले नाही. भाजपने जागा वाटपावर चर्चा करू असे सांगितले आहे. मात्र, पक्षाच्या कार्यकर्त्यांची लोकसभेनुसार जागावाटपाची इच्छा भाजपालाही कळायला हवी, असेही कुशवाहा म्हणाले.
उपेंद्र कुशवाहा हे केंद्रातील सरकारमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. कुशवाहा हे बिहारच्या करकट मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. बिहारध्ये लोकसभेसाठी राष्ट्रीय लोक समता पार्टीने तीन जागा लढवून जिंकल्या होत्या. मात्र, बिहार विधानसभेला 23 जागांपैकी केवळ 2 जागाच या पक्षाला जिंकता आल्या होत्या.
आता हा पक्ष मध्य प्रदेश विधानसभेसाठी लढणार असून भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. आधीच मध्यप्रदेशमध्ये भाजपविरोधी वातावरण असताना कुशवाहांनी जर उमेदवार उभे केले तर भाजपची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.