नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात लवकरच एक बैठक होऊ शकते, अशी शक्यता पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. शांघाई को आॅपरेशन आॅरगनायझेशनच्या (एससीओ) संमेलनात जूनमध्ये कझाकिस्तानातील अस्ताना येथे ही भेट होऊ शकते, असा दावा करण्यात येत आहे. द एक्स्प्रेस ट्रिब्यूनला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानच्या या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, कुलभूषण जाधव हे एक घटक आहेत. पाकिस्तानातील दहशतवादाला प्रोत्साहित करण्याचा भारताचा सहभाग यातून दिसून येत आहे. तरीही आमच्या देशाने शेजारी देशाबाबतच्या भूमिकेत बदल केलेला नाही.पाकिस्तानच्या सैन्यातील सेवानिवृत्त अधिकारी तलत मसूद म्हणाले की, भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यात पाकिस्तानला ऋची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तानातील संबंध सुधारण्यासाठी आणि ते एकत्र येण्यासाठी शांघाई को आॅपरेशन आॅरगनायझेशनच्या सदस्य देशांनी प्रयत्न चालविला आहे. या संघटनेत रशिया, चीन, मध्य आशियाई देश, भारत, पाकिस्तान आदी देशांचा समावेश आहे. २०१५ च्या रशियातील एससीओ संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांची भेट झाली होती, याकडेही लक्ष वेधले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)संबंधांवर परिणाम नकोभारतीय नौदलाचे एक माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील एका न्यायालयाने हेर असल्याचा ठपका ठेवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात तणाव वाढत असतानाच, आता उभय देशांच्या पंतप्र्रधानांच्या बैठकीचे वृत्त येत आहे. जाधव प्रकरणाचा दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ नये, असेच पाकिस्तानला वाटते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
मोदी-शरीफ यांच्या भेटीची शक्यता?
By admin | Published: April 18, 2017 12:48 AM