नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात काल मतदान पार पडले. आतापर्यंत जवळपास 342 जागांसाठी मतदान झाले असून अनेक उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमध्ये बंद झाले आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीसाठी अजून मतदानाचे तीन टप्पे बाकी आहेत. हे तीन टप्पे मे महिन्यात 6, 12 आणि 19 तारखेला होणार आहेत. त्यामुळे सर्व दिग्गज नेत्यांचे लक्ष या तीन टप्प्यांकडे लागून राहिले आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.
समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. अखिलेश यादव यांनी नरेंद्र मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. ‘विकास’ विचारत आहे. पंतप्रधानाचं लाजिरवाणे भाषण ऐकले का? “सवा सौ करोड़” देशावासियांचा विश्वास गमावून आता त्यांनी बंगालमधील 40 आमदारांचे तथाकथित पक्षांतराच्या अनैतिक विश्वासापर्यंत संक्षिप्त केले आहे. ही काळ्या पैशांची मानसिकता बोलत आहे. यासाठी त्यांच्यावर 72 तासांची नाही तर 72 वर्षांची बंदी घातली पाहिजे, अशा शब्दांत अखिलेश यादव यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल चढवला आहे.
उत्तर प्रदेशातील आझमगड लोकसभा मतदार संघातून अखिलेश यादव निवडणूक लढवत आहेत. गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आझमगड मतदार संघातून मुलायमसिंह यादव यांनी निवडणूक लढवली होती. अखिलेश यांच्याविरोधात या मतदार संघातून भोजपुरी सुपरस्टार निरहुआ उर्फ दिनेशलाल यादव याला भाजपाने उमेदवारी दिली आहे.
मोदीजी चहावाले तर आम्ही पण दुधवाले : अखिलेश यादव2014 मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी स्वत:ला चहावाला संबोधले होते. त्यामुळे 2014 मधील लोकसभा निवडणूक बऱ्याच अंशी चहावाला पंतप्रधान होणार या चर्चेच्या आजुबाजूला फिरत होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली चहावाला ओळख मागे सोडून चौकीदार रुप धारण केले आहे. त्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधकांकडून चौकादार मुद्दावरून मोदींवर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच, अखिलेश यादव यांनी मोदींना लक्ष्य केले होते. फरुखाबाद येथे आयोजित सभेत अखिलेश यांनी चहावाला पंतप्रधान याची फिरकी घेतली. मोदी चहावाले असतील तर आम्ही पण दुधावाले असल्याचे अखिलेश यांनी म्हटले होते. मतदारांना संबोधित करताना अखिलेश म्हणाले की, आधी मोदी चहावाला म्हणून जनतेसमोर आले होते. आता तेच मोदी चौकीदार म्हणून समोर आले आहेत. परंतु या चौकीदाराला धडा शिकवण्याची वेळ आल्याचे अखिलेश यांनी सांगितले होते.