नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनाचे औचित्य साधून आपले सोशल मीडिया अकाउंट अनेकांना प्रेरणा देणाऱ्या महिलेला सोपविचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अशा महिलेचा शोध घेण्यात येत आहे. यावर काँग्रेस नेत्या सुष्मिता देव यांनी पंतप्रधान मोदींना एक सल्ला दिला आहे. तसेच अकाउंट सोपविण्यासाठी एका महिलेचे नावही त्यांनी पुढे केले आहे.
सुष्मिता देव यांनी पंतप्रधान मोदींना सल्ला दिला की, त्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट उन्नाव येथील बलात्कार पीडितेला सोपवावे. उन्नाव पीडितेला आपली आपबीती अर्थात तिच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी माहिती जगाला सांगण्याचा हक्क असल्याचे देव यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी आपले सोशल मीडिया अकाउंट महिलांना सोपविण्याचा केलेला दावा फोल आहे. तसेच महिला सुरक्षेसंदर्भात आपली खराब झालेली प्रतिमा सुधारण्याचा मोदींचा हा केविलवाना प्रयत्न असल्याचा दावा देव यांनी केला आहे. सोमवारी मोदींनी ट्विट करून आपण सोशल मीडियापासून दूर जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान मंगळवारी मोदींनी ट्विट केले की, 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून मी माझे सोशल मीडिया अकाउंट अशा महिलेला सोपविणार आहोत, ज्या महिलेचे जीवन आणि काम आपल्याला प्रेरणा देते. यावर सल्ला देताना देव यांनी म्हटले की, तुम्ही तुमचे सोशल मीडिया अकाउंट उन्नाव येथील बलात्कार पीडितेला सोपवावे. जी महिला जीवघेण्या हल्लानंतरही जीवंत आहे. ती पीडिता अत्यंत शूर असून आपली आपबीती सांगण्याचा तिला हक्क असल्याचे देव यांनी म्हटले.