नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडे मागणी केली की, 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात दिल्लीसाठी भरमसाट घोषणा कराव्या. अर्थसंकल्पाच्या वेळी आचारसंहितेची काळजी करू नये, असं आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात 1 फेब्रुवारी रोजी सादर होणारे बजेट लांबवले जाण्याची शक्यता आहे. मात्र हे बजेट लांबवू नये. अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच व्हायला हवा, असं केजरीवाल यांनी म्हटले आहे. आपच्या मुख्यलयात सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दिल्लीतील निवडणुकीमुळे देशाचे बजेट लांबवू नये किंवा दिल्लीसाठी होणाऱ्या घोषणाही टाळल्या जावू नये, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीसाठी या अर्थसंकल्पात अनेक घोषणा व्हायला हव्या. केंद्र सरकारने दिल्लीतील लोकसंख्या कमी करण्यासाठी, वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी, यमुना सफाई, सीव्हर पाण्याचे नियोजन आणि मेट्रोच्या विस्तारासाठी अधिक निधीची तरतूद करावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.
दिल्लीत 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 11 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. दिल्लीला अर्थसंकल्पात भरपूर निधी मिळाल्यास येणाऱ्या सरकारला दिल्लाचा विकास करणे शक्य होईल, असंही केजरीवाल यांनी सांगितले.